पंढरपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाºयांकडून पुढच्या दोन दिवसात पालखी सोहळ्याबाबतची भूमिका स्पष्ट केली जाणार आहे. हे होत असताना ज्या तीर्थक्षेत्र पंढरपूर शहरात यात्रा भरणार आहे, त्याठिकाणचे अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याशीही चर्चा होणे अपेक्षित आहे; मात्र यात्रेसंदर्भातील निर्णय पुणे, सोलापुरात होणार अन् अंमलबजावणी होणार पंढरपूर शहरात... असा प्रकार यात्रा नियोजनात होत असल्याचे दिसून येत आहे.
राज्याची आध्यामिक राजधानी असणाºया पंढरपूर शहरात आषाढी, कार्तिकी यात्रा काळात लाखो भाविक पंढरीत येत असतात. त्यांच्या सेवा सुविधांसाठी शासन दरवर्षी करोडो रूपये खर्च करते. पंढरपूर शहरात स्वच्छतेसंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठ्या प्रमाणात कामे हाती घेण्यात आली. स्वच्छतागृहे, रस्ते, पार्किंग स्थळ, घाट विकसित करण्यात आले. हे करीत असताना त्यासंदर्भात बैठक या विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर होऊन नियोजन करण्यात आले. निधी खर्च करण्यात आला. अजूनही विविध प्रकारची कामे सुरू आहेत. स्थानिकांच्या सूचनांचा तसेच इतर बाबींचा विचार करण्यात आला नाही; मात्र करोडो रूपये खर्च करण्यात आले.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर होणाºया आषाढी यात्रेसंदर्भात होणाºया बैठकीत स्थानिक पातळीवरील परिस्थिती तसेच यापूर्वीचा अनुभव तपासून येणाºया सूचनांचा विचार होणे अपेक्षित आहे. पंढरपूर शहराचे अर्थकारण हे शहरात भरणाºया यात्रांवर अवलंबून आहे. चैत्रीनंतर आता आषाढी यात्रा रद्द झाल्यास त्याचा मोठा परिणाम याठिकाणच्या नागरिकांवर होणार आहे.
‘त्या’ दुकानदार विक्रेत्यांना, धर्मशाळा, मठ चालविणाºयांना काय मदत होऊ शकते का? त्यांना आर्थिक आधार दिला जाऊ शकतो का? याबाबतही शासन पातळीवर विचार होणे स्थानिकांना अपेक्षित असल्याची चर्चा होत आहे.
दोन महिन्यांपासून टाळ मृदंगाचा आवाज नाही- टाळ मृदंगाचा आवाज.., हरिनामाचा जयघोष.., मठ, मंदिरात भाविकांची ये-जा... लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून पंढरपूर शहरात सर्व काही शांत आहे. चार यात्रांपैकी चैत्री यात्रा होऊ शकली नाही. आता सर्वात मोठ्या आषाढी यात्रेबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.
आषाढी यात्रेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. स्थानिकांच्या सूचना विचारात घ्यायला हव्यात. अनेकदा वरिष्ठ पातळीवर निर्णय घेताना हे होत नाही. सध्या कोरोनाला हद्दपार करणे हे महत्त्वाचे असून, प्रशासकीय पातळीवर योग्य तो निर्णय होणे अपेक्षित आहे.- साधना भोसले, नगराध्यक्षा, पंढरपूर
आषाढी संदर्भात पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्यामध्ये चर्चा होऊन जे आदेश येतील त्याचे पालन केले जाईल. कोरोना व्हायरसच्या अनुषंगाने परिस्थिती कशी राहील त्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. - सचिन ढोले, प्रांताधिकारी, पंढरपूर