सोलापूर : सॉफ्ट पेस्टल पेंटिंग काढण्यासाठी विशिष्ट अशा कागदाचा वापर करावा लागतो. पण, कला शिक्षक असलेल्या मल्लिनाथ जमखंडी यांनी ‘लोकमत’च्या पानावर विठू माऊलीचे चित्र साकारले. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर दोन तासांमध्ये हुबेहूब अशी विठ्ठलाची प्रतिमा त्यांनी साकारली.
विठू माऊलीच्या या चित्रामध्ये सॉफ्ट पेस्टल खडूचा वापर करण्यात आला. यासाठी आधार म्हणून लोकमतची न्यूज प्रिंट घेतली. पेपरवर पेन्सिलने स्केच काडण्यात आले. आधी त्या चित्रावर रंग देऊन पुन्हा गरजेनुसार पुसण्यात आले. जिथे जास्त रंग होईल तिथे बोटाने पुसण्यात आले. जिथे अधिक रंग हवा आहे, तिथे रंग दिला जातो. हे चित्र साकारण्यास दोन तासांचा वेळ लागला.
चित्रकार मल्लिनाथ जमखंडी यांनी निलम नगर येथील त्यांच्या घरी हे चित्र साकारले आहे. विठूरायाचे पेस्टल पेंटिंग चित्र हे १८ इंच लांब तर २४ इंच उंच आहे. चित्राच्या मागे कॅलिओग्राफीचा वापर करून विठ्ठल.. विठ्ठल हे शब्द रेखाटण्यात आले आहेत. त्यामुळे हे चित्र अधिक आकर्षक दिसत आहेत. संपूर्ण चित्र हे भिंतीवर ‘लोकमत’ वृत्तपत्राचे पान चिकटवून काढण्यात आले.
पेस्टल पेंटिंग प्रकारचे चित्र हे वृत्तपत्रावर साकारण्यात येत नाही. आम्ही घरी लोकमत वृत्तपत्र घेतो. या वृत्तपत्राचा पुनर्वापर व्हावा या दृष्टिकोनातून लोकमतच्या न्यूज प्रिंटचा वापर केला. चित्र रेखाटण्यासाठी दोन तासांचा अवधी लागला.
- मल्लिनाथ जमखंडी, चित्रकार
पेस्टल्स पेंटिंग म्हणजे
पेस्टल्स म्हणजे खडूचे रंग. ऑईल पेस्टल (क्रेयॉन) आणि ड्राय /सॉफ्ट पेस्टल असे दोन प्रकार यात असतात. मल्लिनाथ जमखंडी यांनी ड्राय पेस्टलमध्ये चित्र साकारले आहे. ड्राय पेस्टलमध्ये ऑईल बेस्ड बाईंडर नसतात, त्यामुळे ते स्मज करता येतात. याचा तसेच, हॅचिंग, क्रॉस हॅचिंग, लिनिअर स्ट्रोक्स, शॉर्ट स्ट्रोक्स आदि तंत्रांचा वापर करून चित्र रंगवले जाते. बोटाने, रुमालाने, पेपर स्टंप , टिश्यू पेपर ई. ने स्मज करून वेगवेगळे इफेक्ट मिळवता येतात. चित्र पूर्ण झाल्यावर खराब होऊ नये म्हणून फिक्सेटिव्ह मारावे लागते.