पंढरपूर : आषाढी एकादशी यात्रेसाठी ४६ दिवसांचा कालावधी आहे. या कालावधीमध्ये 'कोरोना'चा प्रादुर्भाव कशा पद्धतीचा असेल, याचा अंदाज लावता येणार नाही. यामुळे आषाढी यात्रेचा निर्णय ३० मे रोजी घेण्याबाबतची चर्चा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीमध्ये झाली आहे.
आषाढी यात्रेच्या नियोजनासंदर्भात मुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे, सातारा व सोलापूर आदी जिल्ह्यातील प्रशासन व महाराज मंडळ यांचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली.
या बैठकीमध्ये आषाढी यात्रेसाठी मानाच्या प्रमुख पालख्या पंढरपुरात आल्या पाहिजेत, प्रातिनिधिक स्वरूपात आषाढी यात्रा व्हावी, यात्रेसाठी मानाच्या प्रमुख पालख्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहावे, परंतु शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे यात्रा व्हावी असे मत मंदिर समितीचे सहाय्यक अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज यांनी मांडले.
त्याचबरोबर आषाढी यात्रा संदर्भात निर्णय घेताना पंढरपुरातील नागरिकांचा विचार करावा अशी सूचना नगराध्यक्षा साधना भोसले यांनी केली.
या बैठकीमध्ये काही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. यासाठी मे महिन्याअखेर पुन्हा अशाच पद्धतीची बैठक घेतली जाणार आहे. तत्कालीन परिस्थिती पाहून आषाढी यात्रेचे नियोजन करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.