कुर्डूवाडी : कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या महिलेचा सरकारी डॉक्टरांच्या सूचनेनुसार जबाब नोंदवून घेण्यास गेलेल्या आशावर्करला बाधित महिला आढळून आली नाही. तेव्हा आशावर्करने घरी मुलीचा जबाब नोंदवून ती माघारी परतली. याचा मनात राग धरून कोरोनाबाधित महिलेच्या पतीने आशावर्करला तिच्या घरी जाऊन शिवीगाळ करत मारहाण केली.
या मारहाणीत आशावर्कर शोभा प्रवीण मेहता (वय ३५, रा. कव्हे, ता. माढा) या जखमी झाल्या असून माढा तालुक्यात कव्हे येथे शुक्रवार, २१ मे रोजी सायंकाळी ५ वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी सुधीर रंगनाथ चोपडे (रा. कव्हे, ता. माढा) याच्याविरुद्ध कुर्डूवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार शोभा मेहता या कव्हे गावात आशावर्कर म्हणून सन २०१० पासून काम करताहेत. याच गावातील एका महिलेचा १४ मे रोजी कोरोना अहवाल हा बाधित आला. त्यावेळी कव्हे येथील आरोग्य उपकेंद्रातील डॉक्टरांच्या व ग्रामपंचायत पदाधिका-यांच्या सूचनेनुसार तिला कुर्डूवाडी येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यास आशावर्करला सांगण्यात आले होते. संबंधित आशावर्कर त्या महिलेच्या घरी गेल्या असता, त्यांनी विलगीकरणाला विरोध केला. विलगीकरणात न राहता घरीच राहते, अशी भूमिका घेतली.
---
मुलीचा जबाब नोंदवून घेतला
बाधित महिला घरी थांबल्याबाबतचा जबाब सरकारी डॉक्टरांनी घेण्यास सांगितले. पुन्हा आशावर्कर या २१ मे रोजी सकाळी ९.३० वाजता तिच्या घरी पोहोचल्या. परंतु, संबंधित बाधित महिला घरी नसल्याचे निदर्शनास आले. फिर्यादी आशावर्करने तिथे उपस्थित आसणा-या तिच्या मुलीचा लेखी जबाब नोंदवून घेत माघारी परतली. याचा मनात राग धरून बाधित महिलेच्या पतीने सायंकाळी घरी आल्यानंतर ५ वाजण्याच्या सुमारास आशावर्करच्या घरी जाऊन तिला व तिच्या घरच्यांना शिवीगाळ, मारहाण केली.
तपास पोलीस कॉन्स्टेबल जाधव करीत आहेत.