सांगोला : कोरोनाच्या ताळेबंदीत शेतीमाल व भाजीपाल्याची साखळी खंडित झाल्यानंतर डिकसळ (ता. सांगोला) येथील प्रकाश गायकवाड यांनी कोण काय म्हणेल याकडे दुर्लक्ष केले. कोरोनाला न घाबरता शेतकºयाकडून भाजीपाला व फळे खरेदी करून ते आई, वडील, पत्नी व भाच्याच्या सहकार्याने लॉकडाऊनच्या काळात सुमारे २८ हजार ४०० किलो भाजीपाला व फळे विक्री करून ५ लाखांच्या व्यवसायातून हजारो रूपये कमविले आहेत. डिकसळ येथील प्रकाश गायकवाड हा तरूण मागील १० वर्षांपासून फळे व भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत आहे. तसा प्रकाश शिवसेनेचा शाखाप्रमुख असून आ. शहाजीबापू पाटील यांचा कट्टर समर्थक आहे. समाजकारण व राजकारणामध्ये दंग असलेला प्रकाश आज गावासह परिसरात भाजीपाला व फळे विक्री करण्यासाठी तितकाच प्रसिद्ध आहे.
घरची केवळ ५ एकर शेतजमीन असून तीही पाण्याअभावी नापिक आहे. पण थोड्याफार जमिनीमध्ये भाजीपाला व अन्य पिके घेऊन प्रकाश आपला संसाराचा गाडा चालवित आहे. घरी आई, वडील व पत्नीच्या सहकार्याने दूध व्यवसायाबरोबरच पहाटे ५ वाजल्यापासून परिसरातील गावांमधून भाजीपाला व फळे खरेदी करून परिसरातील लोकांसाठी घरपोच सेवा देत आहे.
लॉकडाऊनपूर्वी प्रकाश आपला भाजीपाला खासगी वाहनातून मुंबईला पाठवित होता, परंतु लॉकडाऊनमुळे सर्व वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्यामुळे प्रकाशने या कालावधीत शेतकºयांकडून दैनंदिन खरेदी केलेली फळे व भाजीपाला गावठाण व वाड्या-वस्त्यांवर फिरून विक्री करीत आहे. त्याने फळे व भाजीपाला येळवी, पारे, घेरडी, लोहगाव, वायफळ, हंगिरगे आदी गावांमधील शेतकºयांकडून खरेदी केला व तोच माल नियोजन करून डिकसळ परिसरासह वाड्यावस्त्यांवर सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत तर सायंकाळी ४ ते ६ या वेळेत वाड्या वस्त्यांवर फिरून विक्री करीत आहे. यामुळे नागरिकांना घरबसल्या भाजीपाला मिळू लागला आहे.
गावामध्ये सामाजिक व राजकीय क्षेत्रांमध्ये तो सतत प्रकाशमयच असतो. त्याच्या भाजीपाला व्यवसायाला भाचा गणेश शिंदे मोलाची साथ देत असल्यामुळे मामा -भाच्याने मिळून लॉकडाऊनच्या काळात आत्तापर्यंत २८ हजार ४०० किलो फळे व भाजीपाला विक्री करून सुमारे ५ लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे.
अशी केली फळे व भाजीपाला विक्री - टोमॅटो २ हजार ४०० किलो, वांगी ४ हजार किलो,मिरची ६०० किलो,गवार ५ हजार किलो,कांदा ३ हजार किलो,दोडका १ हजार किलो, सिमला मिरची १ हजार किलो ,कारले १ हजार किलो,कोबी ३ हजार किलो इतर पाले भाजीपाला ३ हजार जोड्या तर फळे-चिक्कू ३ हजार किलो, पेरू १ हजार ५०० किलो, कलिंगडे १ हजार किलो असा माल विक्री केला.
मागील दहा वर्षांपासून फळे व भाजीपाल्याचा व्यवसाय करीत असून लॉकडाऊनपूर्वी हा सर्व माल मुंबईला पाठवित होतो. परंतु लॉकडाऊनमुळे फळे, भाजीपाला गाव परिसर वाड्यावस्त्यांवर फिरून विक्री करीत आहे. आत्तापर्यंत ५ लाख ४ हजार रुपये मालाच्या विक्रीतून दरमहा १५ ते २० हजार रुपये इतका नफा मिळाला आहे.- प्रकाश गायकवाड, भाजीपाला विक्रेता