सोलापूर : भाजपने ईडीकडून वारंवार छापे टाकून आणि दबाव टाकून अशोक चव्हाण यांना ब्लॅकमेल केलं. भाजपने वारंवार ईडीची भीती दाखवल्यामुळे अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडली आणि राजीनामा दिला अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यावर आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, अशोक चव्हाण यांचा राजीनामा काँग्रेससाठी दुर्दैव गोष्ट आहे. ते भारदस्त नेता होते. लोकांना ब्लॅकमेल करणे हे भाजपचे तंत्र आहे. अशोक चव्हाण यांनी दबावाखाली हा निर्णय घेतल्याचा दावा आमदार शिंदे यांनी केला.
आम्ही काँग्रेस सोडणार नाही
काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या सुद्धा भाजपमध्ये जातील अशी चर्चा आहे. यावर शिंदे म्हणाल्या, आमच्या राजीनामा बाबतीत बोलल्या जाणाऱ्या गोष्टी या सगळ्या अफवा आहेत. मी आणि साहेबांनी ( सुशीलकुमार शिंदे) याबाबतीत स्पष्टीकरण दिलेले आहे.आमच्याकडे कोणत्याही संस्था नाहीत. त्यामुळे भाजपवाले आम्हाला ईडीची भीती ते दाखवू शकत नाहीत. मला भाजपचे विचार पटत नाहीत. त्यामुळे मी काँग्रेस सोडण्याचा प्रश्नच येत नाही असेही शिंदे म्हणाल्या.