सांगोला : एका मोबाईल टाॅवर कंपनीच्या ठेकेदाराने नोकरीचा राजीनामा मागितल्याच्या कारणावरून आणि तीन महिन्यांचा थकीत पगार न केल्याच्या मानसिक संतापातून सुरक्षा रक्षकाने बुधवारी सायंकाळी त्याच टॉवरवर चढून आत्महत्येचे पाऊल उचलले.
विजय शिवाजी नारनवर (वय ३५, रा. महीम कारंडेवाडी, ता. सांगोला) असे आंदोलनकर्त्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. मात्र, ग्रामस्थांनी वेळीच आंदोलनाची दखल घेऊन कंपनीच्या अधिकार्यांशी चर्चा केली. पगार व नोकरीवरून काढून न टाकण्याचे आश्वासन घेऊन त्या सुरक्षा रक्षकाला आत्महत्येपासून परावृत्त केले. दरम्यान, सुरक्षा रक्षकाने शोले स्टाईलने टॉवरवर चढून आंदोलन केल्यामुळे बघ्यांची गर्दी झाली. त्या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला होता. सांगोला तालुक्यात महिम येथील भाळवणी रोडवर आंदोलन झाले.
पोलीस पाटील अभय रूपनर, सोमनाथ मरगर, मोहन कारंडे, सीताराम नारनवर, दिलीप कारंडे, दादा नारनवर, श्रीकांत चौगुले, पोलीस हेडकॉन्स्टेबल तानाजी लिंगडे यांना आंदोलनाचा प्रकार समजला. सर्वांनी त्याची मनधरणी केली.
---
फोटो : १७ सांगोला स्ट्राईक
नोकरीचा राजीनामा मागितल्यावरून सुरक्षा रक्षक विजय नारनवर याने महिम-भाळवणी रोडवरील मोबाईल टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला.