वडवळ : शतावरी औषधी वनस्पतींची लागवड करून येणारे पीक एकरी तीन लाख रुपये मोबदला देऊन विकत घेण्याचे आश्वासन देत गुंतवणूकदारांना आयुष मंत्रालयाचा संदर्भ देऊन गुंतवणुकीस भाग पाडले अन् राज्यातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाली. या फसवणुकीचे लोण आता मोहोळ तालुक्यातील वडवळपर्यंत आले आहे. येथील युवा शेतकरी मनोज मोरे यांचीदेखील याच कंपनीने फसवणूक केली आहे.
सन २०१८-२०१९ मध्ये मनोज मोरे यांनी वडवळ येथे शतावरीचे पीक घेतले. यासाठी रोप व वर्षभराचा एकूण खर्च दोन लाखांपर्यंत आला. नंतर एक टनाला ५०,००० रु.प्रमाणे खरेदी करण्याचे आश्वासन मिळाले होते. मोरे यांनी जवळपास नऊ टन माल वजन करून कंपनीकडे तो माल देण्यात आला. नंतर कोरोना लॉकडाऊन, आदी कारणाने विलंब झाला. खूप हेलपाटे मारूनही हाती काहीच आले नाही. मोरे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी पुणे येथे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना भेटून शेतकऱ्यांनी हकिकत सांगितली. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने तपास करून ऋषिकेश पाटणकरला अटक केली आहे.
----
शेतात काहीतरी नवीन प्रयोग करून वेगळी वाट शोधण्यासाठी प्रयत्न केला. खूप कष्ट केले; मात्र अशी फसवणूक झाल्यामुळे मानसिक त्रास खूप झाला. याबाबत तक्रार तर दाखल केली आहे. पाहूया पुढे काय होतंय.
- मनोज मोरे, शेतकरी, वडवळ