पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मयत परमेश्वर अवताडे हा मागील सहा महिन्यांपासून पत्नी प्रभावती हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. गावातील लोकांनी समजूत काढून वाद मिटविण्याचे प्रयत्न केले. मात्र, यश आले नाही. त्याने आठ दिवसांपासून कामधंदा सोडून दिला. २९ मार्च रोजी पत्नीला तू घराबाहेर जातेस म्हणून शिवीगाळ करून भांडण केले. तेव्हा पत्नी मी माहेरी जाते म्हणत असताना तू कशी जाते बघतो म्हणून स्वयंपाकघरातील कांदा कापण्याचा चाकूने पत्नीला मानेवर, छातीवर, खांद्यावर वार केले. त्यात ती गंभीर जखमी झाली. तेव्हा तिला घरात कोंडून दोन्ही मुलांना घेऊन तो निघून गेला.
दरम्यान, भावजईने दार उघडून पाहिले, तर प्रभावती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. आरडाओरडा केला असता सासरे अभिमन्यू हे आले. त्यांनी कुंभारी येथील रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल केले. तिला आराम वाटू लागल्यानंतर ३० मार्च रोजी उत्तर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा पतीविरोधात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा नोंद झाला. नंतर पोलिसांनी पती परमेश्वर अवताडे याचा शोध सुरू केला. तेव्हा स्वत:च्या शेतातील बोरीच्या झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याचे ३१ मार्च रोजी निदर्शनास आले आहे. घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक विलास नाळे, अंमलदार बिपीन सुरवसे यांनी भेट देऊन पाहणी केली. याबाबत मयताचा भाऊ नागनाथ अवताडे यांनी खबर दिली.