चालू वर्षात कोरोनामुळे गेल्या आठ महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच झाल्या नाहीत. जूनपासून बऱ्याच ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने प्रशासकाचा कारभार सुरू झाला आहे. डिसेंबरअखेर ६५८ ग्रामपंचायतीची मुदत संपत असून, यावर प्रशासकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मंगळवेढा-पंढरपूर विधानसभेचे आमदार भारत भालके यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली आहे. याशिवाय सोलापूर महापालिकेतील वत्सला बरंगडे, दुधनीचे सातलिंगप्पा म्हेत्रे यांचे निधन झाल्याने जागा रिक्त झाल्या आहेत. याचबरोबर पंढरपूर नगपालिकेतील एक जागा, संजयमामा शिंदे करमाळा विधानसभेवर निवडून गेल्याने कुर्डू जिल्हा परिषदेच्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.
नगरपालिकेतील रिक्त जागांबाबत शासनाने माहिती मागविल्याचे जिल्हा प्रशासन अधिकारी पंकज जावळे यांनी सांगितले. अशाचप्रकारे इतर रिक्त जागांची माहिती यापूर्वीच शासनाला सादर करण्यात आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी तर पूर्वीपासूनच सुरू झाली आहे.
तालुकानिहाय ग्रामपंचायत संख्या
जुलै ते डिसेंबर २०२० अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या पुढीलप्रमाणे आहे. करमाळा : ५१, माढा : ८२, बार्शी : ९६, उत्तर सोलापूर : २४, मोहोळ : ७६, पंढपूर : ७२, माळशिरस : ४९, सांगोला : ६१, मंगळवेढा : २३, दक्षिण सोलापूर : ५२, अक्कलकोट : ७२.
नोव्हेंबरमध्ये ५१९ प्रशासक
जुलैमध्ये दक्षिण सोलापुरातील चार ग्रामपंचायतींवर प्रशासकाचा कारभार सुरू झाला आहे. ऑगस्टमध्ये १२३ ग्रामपंचायतींवर तर सप्टेंबरमध्ये एकही नाही, ऑक्टोबरमध्ये ६ आणि नोव्हेंबरअखेर ५१९ ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे. डिसेंबरअखेर ६ ग्रामपंचायतीची मुदत संपणार आहे.