सोलापूर : कनिष्ठ महाविद्यालयाच्या एचएससी सांकेतिक क्रमांक नुतनीकरण करण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागातील माध्यामिक शिक्षण विभागातील सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक सुर्यकांत रामचंद्र सुतार यास अडीच हजार रूपयाची लाच स्वीकारताना सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले़
तक्रारदार यांचे जाणताराजा बहुउद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळाच्या अंतर्गत कनिष्ठ महाविद्यालयाच्या एचएससी सांकेतिक क्रमांक नुतनीकरण करण्यासाठी शिक्षण विभाग (माध्यामिक) यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता़ सदर प्रस्तावावर शिफारस पत्र देण्यासाठी सहा़ शिक्षण उपनिरीक्षक सुतार यांनी ५ हजार रूपये लाचेची मागणी केली होती़
याबाबतची तक्रार नोंदविला होती़ यावरून सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खात्री केली़ या खात्रीत सुतार यांनी लाचेची मागणी केल्याचे सिध्द झाले़ त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावली़ या सापळ्यात जिल्हा परिषदेतील माध्यामिक विभागातील त्यांच्या कक्षात अडीच हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले़
याप्रकरणी लोकसेवक सुर्यकांत रामचंद्र सुतार (वय ५३ रा़ सी ३६ अदित्य नगर, सोलापूर) यांच्याविरूध्द सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़ सदरची कारवाई पोलीस उपायुक्त संदीप दिवाण, सहा़ पोलीस उपअधिक्षक अरूण देवकर यांच्या पथकाने केली़