सोलापूर : 'कोरोना'मुळे एमआयडीसी पाेलीस ठाण्यातील साहाय्यक फौजदाराचा मृत्यू झाला आहे. हे साहाय्यक फौजदार वालचंद कॉलेजजवळील एकता नगरचे रहिवासी होते. कोरोनाचा जिल्ह्यातील हा दहावा बळी आहे.
साहाय्यक फौजदाराला २९ एप्रिल रोजी पोलीस ठाण्यात असताना ताप आणि कणकण आली होती. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना भेटले. त्यांच्याकडून औषधे घेतली. त्यानंतर रजा घेतली. तीन दिवस घरी आराम केला. घरी पुन्हा त्रास होऊ लागल्याने एका सहकारी कर्मचाऱ्याने त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या ठिकाणी त्यांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली. सोमवारी त्यांचा मृत्यू झाला आहे. मृत्यनंतर त्यांची स्वॅब टेस्ट पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला.
या पाेलिसाचा दफनविधी करण्यात आला आहे. कोरोनामुळे मंगळवारी नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले होते. बुधवारी आणखी एकाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून, हा दहावा बळी आहे.
सोलापुरात बुधवारी कोरोनाचे आणखी आठ रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांची एकूण संख्या १५३ वर पोहोचली आहे.