सांगोला : दिघंची-महूद रस्त्यावर कटपळ येथे कार आणि पिकअपच्या अपघातात एका सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू झाला. तसेच त्यांच्या पत्नीसह दोन्ही वाहनातील सातजण जखमी झाले. पोलीस कुटुंबातील जखमींवर अकलूज येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यात पत्नी, बहीण, मेहुणे आणि लहान मुलांचा समावेश असून
गणेश भीमराव जरांडे (वय ३२ रा. कळस ता. इंदापूर जि.पुणे) असे मरण पावलेल्या सहाय्यक फौजदाराचे नाव असून ते सध्या नवी मुंबई पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. गुरुवार मध्यरात्री दीडच्या सुमारास हॉटेल किनारा जवळ हा अपघात झाला.
या अपघातात सोनाली गणेश जरांडे (वय २५), समर्थ गणेश जरांडे (वय ३, रा. कळस, ता. इंदापूर ), नानासाहेब सखाराम गाढवे (४२), अर्चना नानासाहेब गाढवे (३२), संग्राम नानासाहेब गाढवे (१८), ( सर्व रा. रत्नपुरी, संग्राम नगर, अकलूज, ता. माळशिरस) हे जखमी झाले आहेत.
पाेलीस सूत्रांकडील माहितीनुसार सहाय्यक फौजदार गणेश भीमराव जरांडे, पत्नी सोनाली व मुलगा समर्थ, मेहुणे नानासाहेब सखाराम गाढवे, भगिनी अर्चना नानासाहेब गाढवे, भाचा संग्राम नानासाहेब गाढवे हे दोनही कुटुंब मंगळवारी कारमधून (एम. एच. १२, सी. डी. ८८८५) गणपतीपुळे येथे सहलीवर गेले होते. दोन दिवस कोकणातला निसर्गरम्य स्थळांचा आनंद लुटून जरांडे, गाढवे कुटुंब परतीच्या प्रवासाला लागले. ते अकलूजकडे निघाले होते.
दरम्यान त्यांची कार गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास दिघंची- महुद रस्त्यावरुन येत असताना महुदहून कांदा घेऊन निघालेल्या (एम. एच. २५, आर. ००८१) पिकअपने त्यांच्या कारला कटफळ जवळ समोरून धडक दिली. या भीषण अपघातानंतर मोठा आवाज झाला. हा आवाज ऐकून कारमध्ये अडकलेल्या जखमींना सीताराम खरात, महेंद्र खरात, शहाजी खरात आणि इतर लोकांनी कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढले. या अपघातात सहाय्यक फौजदार गणेश जरांडे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. पत्नी अर्चना, मुलगा समर्थ, मेव्हणे नानासाहेब गाढवे, अर्चना गाढवे, संग्राम गाढवे यांच्या हातापायांना दुखापत झाली. डोक्यालाही गंभीर मार लागल्याने रूणवाहिकेतून तत्काळ उपचाराकरिता अकलूज येथे खासगी रुग्णालयात दाखल केले. यावेळी पिकअपमधील जखमींची नावे समजू शकली नाही. याबाबत सीताराम उत्तम खरात (रा. शेरेवाडी ता. सांगोला) यांनी पिकअप चालकाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रताप वसगडे करीत आहेत.
अपघातस्थळी कांदेच कांदे
अपघातातील पिकअपमधून कांद्याची वाहतूक सुरू होती. जरांडे यांच्या कारला धडकल्यानंतर या पिकअपमधील कांदे रस्त्यावर पसरले. या अपघाताची माहिती मिळताच सांगोला पोलिसांनी धाव घेतली आणि गर्दी पांगवली.
फोटो : २१ सांगोला अक्सिडेंट
दिघंची- महूद रस्त्यावर झालेल्या अपघातातील सहाय्यक फौजदार गणेश जरांडे यांच्या कारची अवस्था अशी झाली.
फोटो : २१ सांगोला अक्सिडेंट १
गणपतीपुळे येथे सहलीवर गेलेल्या गणेश जरांडे, पत्नी अर्चना व मुलगा समर्थ यांच्यासमवेत बुधवारी दुपारी समुद्रातील पाण्यात आनंद घेताना फोटो काढला होता. पत्नीसमवेतचा हा फोटो अखेरचा ठरला .
फोटाे : २१ गणेश जरांडे