सोलापूर : पंढरपूर मोहोळ मार्गावरील देगावजवळ अज्ञात वाहनाने कट मारल्याने टाटा एस टेम्मो काटेरी झाडामध्ये घुसून गंभीर जखमी झालेल्या चार जणांना आरटीओच्या पथकाने मदत केली. या अपघातात टेम्पोतील एकजण ठार तर अन्य तिघेजण गंभीर झाले आहेत.
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे, सहायक परिवहन अधिकारी सतीश जाधव, मोटार वाहन निरीक्षक अतुल भागवत हे आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात आयोजित बैठकीला उपस्थित राहण्यासाठीजीपने निघाले होते. देगावजवळ अपघात झाल्यामुळे रस्त्यावर बघ्यांची गर्दी दिसून आली. चालक शिवाजी गायकवाड यांनी जीप थांबविल्यावर उप प्रादेशिक अधिकारी डोळे यांनी घटनास्थळी भेट दिल्यावर काटेरी झुडुपात टाटा एस टेम्मो अडकलेला दिसला. केबीनमध्ये चारजण गंभीर जखमी अवस्थेत विव्हळत पडल्याचे त्यांच्या निदर्शनाला आले.
अपघातग्रस्तांना मदतीची अपेक्षा असताना गर्दीतील लोक बघ्याची भूमिका घेत आहेत हे लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने इतर सहकाºयाच्या मदतीने टेम्पो बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण टेम्पो गिअरमध्ये बंद पडल्यामुळे जागचा हलत नव्हता. लोकांना मदतीचे आवाहन केल्यावर सर्वांच्या ताकदीने टेम्पो उचलून बाहेर काढण्यात आला.
त्यानंतर दरवाजे तोडून आतील जखमींना बाहेर काढण्यात आले. १0८ नंबरवरून अॅम्बुलन्स बोलावून जखमींना तातडीने पंढरपूरकडे उपचारासाठी हलविण्यात आले. पण रुग्णालयात दाखल केल्यावर एका जखमीचा मृत्यू झाल्याचे सहायक परिवहन अधिकारी जाधव यांनी सांगितले. आरटीओच्या पथकाने समयसूचकता दाखविल्याने इतर जखमींना वेळेवर उपचारास हलविण्यास मदत झाल्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.