सोलापूर : मोठ्ठं वडाचं झाड. आजूबाजूला महावितरणच्या तारा.. अशा अडचणीत एका घारीचे पंख पतंगाच्या मांजा अडकला. जिवाच्या आकांताने सुटकेचा प्रयत्न केला, मात्र घार अधिक अडकत केली. वन्यजीवप्रेमींना ही खबर मिळाली. त्यांनी महापालिका, महावितरणची मदत घेऊन त्या घारीची सुटका केली. रविवारी सकाळी १०.३० वाजता तेलंगी पाच्छा पेठेत वडाच्या झाडावर ही घटना उघडकीस आली. ४० फूट उंचावर अडकलेल्या घारीची एका तासानंतर सुटका झाली.
अधिक माहिती अशी, रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास तेलंगी पाच्छा पेठेतून राजा काझी यांनी वाइल्ड लाइफ केअर संस्थेला फोन करून वडाच्या झाडावर घार अडकल्याची खबर दिली. घटनास्थळी सदस्य मुकुंद शेटे, प्रवीण जेऊरे, तेजस म्हेत्रे पोहोचले. प्रशस्त अशा वडाच्या झाडावर घार आढळून आली. झाडाच्या आजूबाजूला सर्वत्र विजेच्या तारांचा विळखा होता.
----
एक तास चालली रेस्क्यू मोहीम
सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी परदेशी यांना संपर्क साधून हायड्रॉलिक बास्केट गाडी मागविण्यात आली. वाहनचालक मोरे तत्काळ घटनास्थळी पोहोचले. विजेच्या तारांचा संभाव्य धोका ओळखून वीज महावितरणचे अधिकारी दिघे यांना घटनेची माहिती दिली. जोड बसवण्णा वितरण केंद्रातून वायरमन नितीन बोंडगे आले. आणि सर्व परिसरातील वीज बंद करून रेस्क्यू मोहीम सुरू झाली. ४० फूट उंचीवरील वडाच्या झाडावर अडलेल्या घारीची सुटका करण्यासाठी तब्बल एक तास लागला.
----
अन् घारीनं घेतली आकाशात झेप
बास्केटमधून प्रवीण व तेजस घारीपर्यंत पोहोचले. परंतु वडाच्या दाट फांद्यांमुळे दहा फूट अंतर कमी पडत होते. बांबूला कटर व हूक लावून पतंगाचा मांजा कट करण्यात आला. घार खाली घेताच तिला टॉवेलच्या मदतीने पकडून पंखात फसलेला सर्व मांजा काढण्यात आला. प्राथमिक उपचार करून घारीला जमिनीवर सोडले असता, घारीने क्षणाचाही विलंब न करता आकाशात झेप घेतली.
---
दिवाळीत यंत्रणा धावली
दिवाळीच्या सुट्ट्या सुरू आसताना ही शासकीय यंत्रणा तत्काळ एका मुक्या जिवासाठी मदतीला धावून आली. पतंग उडविताना चिनी नायलॉन दोरा वापर करू नये, असे आवाहन वाइल्ड लाइफ केअर संस्थेकडून करण्यात येत आहे.