सोलापूर : कडबगाव (ता. अक्कलकोट) जवळ अक्कलकोट स्टेशन येथील व्यापारी गाळ्याला अचानक रात्री लागलेल्या आगीत चार लाखांचे साहित्य जळून खाक झाले आहे. ही घटना २७ मार्च रोजी रात्री साडेबारा वाजता घडली आहे. याबाबत महसूल विभागाचे तलाठी यांनी पंचनामा करून अहवाल सादर केला आहे.
अधिक माहिती अशी की, बुधवार, २७ मार्च रोजी रात्री १२:३० वाजता अचानकपणे लागलेल्या आगीत अंबादास सिद्धाराम दळवी यांच्या इस्त्री दुकानातील ग्राहकांचे पँट, शर्ट, साड्या, सूट, यासह फर्निचर, काचेचे कपाट, खुर्ची, पत्राशेड, वगैरे जळून खाक झाले. तसेच प्रकाश मोहन शहा यांच्या जनरल स्टोअर्सला लागलेल्या आगीत फ्रीज, लॅपटॉप, होम थिएटर, फर्निचर, कोल्ड्रिंक्स असे मिळून २लाख ७७ हजर रुपयाचे नुकसान झाले आहे. रोहित दत्तू भालेराव यांचे सीएसटी सेंटर जळून खाक झाले आहे. त्यामध्ये प्रिंटर, मिक्सर, टेबल, प्लास्टिक वस्तू असे १९ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याबरोबरच सचिन लक्ष्मण राठोड यांचे पान शॉप जळून २० हजारांचे नुकसान झाले. असे एकाच रात्रीत एकाच वेळी सलग चार दुकाने, पत्राशेड, त्यामधील साहित्य जळून ४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत दक्षिण पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. तलाठी श्रीशैल हिरेमठ यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. पंचनाम्याप्रसंगी जाफर मुल्ला, श्रीकांत चव्हाण या पंचाबरोबर कोतवाल प्रदीप शिवशरण उपस्थित होते.