सोलापूर : डिजिटल प्रणालीचा वापर करून पेपरलेस कारभार करण्यावर शासन मोठ्या प्रमाणात जागरण मोहीम राबवत आहे. त्याअनुषंगाने अलीकडे बँकांमध्ये खाती असलेली मंडळी थेट बँकेत न जाता एटीएमद्वारे पैसे भरणे व काढण्याच्या व्यवहारावर अधिक भर देत आहेत; मात्र गेल्या काही महिन्यांपासून एटीएममधून मजकूर लिहिलेल्या नोटा मिळू लागल्या आहेत. त्या नोटा बाजारपेठेत तसेच बँकांमधून स्वीकारण्यास नकार मिळू लागल्याने ग्राहकांना ही डोकेदुखी बनली आहे.
केंद्र सरकारने नोटबंदीनंतर ज्या नवीन नोटा बाजारात आल्या त्यावर कोणताही मजकूर आढळल्यास त्या स्वीकारु नयेत असा आदेश काढला. नोटांचे अस्तित्व अधिक काळ टिकावे, त्या सुस्थितीत राहाव्यात हा यामागचा हेतू आहे. प्रारंभीच्या काळात याचा परिणाम जाणवला. नोटा चकाचक मिळत असत; मात्र गेल्या चार-पाच महिन्यांपासून एटीएममधून मजकूर लिहिलेल्या नोटा मिळत आहेत. यामुळे ग्राहकांना डोकेदुखी ठरत आहे. विविध भागांमधून ज्या नोटांवर अक्षरे लिहिली आहेत अशा नोटा बँकांमधून स्वीकारण्यास असमर्थता दर्शविली जात आहे.
एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित आहे. सुरुवातीच्या काळात त्यांच्याकडून चोख अंमलबजावणी व्हायची मात्र अलीकडे त्यांच्याकडून शहानिशा न करता अक्षरे गेलेल्या नोटाही भरल्या जाताहेत. याच नोटा बँकांमध्ये ग्राहकाकडून स्वीकारत नाहीत याबद्दल ग्राहकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
यासंदर्भात ग्राहकांकडून बँकांमध्ये याबद्दल गाºहाणे मांडले असता शासनाने नोटांवर कोणत्याही प्रकारचा मजकूर असल्यास त्या स्वीकारू नयेत असे निर्देश बँकांना दिले असल्याचा हवाला देत बँका या नोटा ग्राहकाकडून घेण्यास नकार दिला जात आहे. अनेक प्रश्नांनी ग्राहकांना भंडावून सोडले जाते. पैसे काढल्याची पावती आणण्यास सांगितले जाते. यावर उपाययोजना करावी, अशा आशयाची मागणी ग्राहकांमधून होऊ लागली आहे.
ग्राहकांनी दाद कोठे मागावी ?- मुळात सरकारने नोटांवर काही लिहू नये असे निर्देश दिले आहेत.संबंधित आदेशाचे पालन ज्या एजन्सीला पैसे भरण्याचे अधिकार देण्यात आले आहेत त्या पाळत नाहीत. त्यांच्या दुर्लक्षामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. एटीएममधून मजकूर लिहिलेल्या दैनंदिन व्यवहार अथवा पुन्हा बँकेमध्ये संबंधित पैसे भरावयाचे असल्यास स्वीकारले जात नाही. अशा अवस्थेत ग्राहकाने कोणाकडे दाद मागावी, असा सवाल बद्रिशकुमार कोडगे, सुभाष दंडवते, विजय देशपांडे, सायली गायकवाड, संध्या शिवपुजे, सिद्धाराम स्वामी यासह विविध बँकांच्या ग्राहकांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
एटीएममध्ये पैसे भरण्याची यंत्रणा काही बँकांच्या कर्मचाºयामार्फत राबवली जाते. काही ठिकाणी अन्य यंत्रणेमार्फत पैसे भरण्यात येतात. पैसे भरताना त्यांच्याकडून खबरदारी घेण्यात येते; मात्र मजकूर लिहिलेल्या अशा नोटा एटीएममधून मिळाल्यास ग्राहकांनी आपल्या बँकांशी संपर्क साधून बदलून घ्याव्यात.- अभय विजारदार, ट्रेझरी शाखा व्यवस्थापक, स्टेट बँक आॅफ इंडिया