सोलापूर : रिक्त जागेवर सागर राजगुरू यांना नियुक्त न करता हक्क डावलल्याप्रकरणी टेंभुर्णी येथील जनता विद्यालयाचे २००८-२०२० काळातील सचिव, चेअरमन यांच्याविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासाठी राजगुरू नागरी हक्क संरक्षण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या आदेशान्वये टेंभुर्णी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार २००८ साली प्रयोगशाळा सहायक पदावर कार्यरत असलेले भागत भीमराव राजगुरू यांचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर मुलगा सागर राजगुरू यांना वडिलांच्या जागेवर अनुकंपातत्त्वावर प्रयोगशाळा सहायक अथवा शिपाई पदावर नेमणूक करावी म्हणून त्यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाकडे अर्ज केला होता. परंतु, २००८-२०२० काळात शिक्षण प्रसारक मंडळाने सागर राजगुरू यांची अनुकंपा तत्त्वावर नेमणुकीचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठवलाच नाही. उलट २०१३ साली संस्थेने खुल्या वर्गातील एकाची शिपाई पदावर नियुक्ती केली.
या काळात सागर राजगुरू याने शिक्षणाधिकारी, शिक्षणमंत्री, शिक्षण उपसंचालक, शिक्षण आयुक्त आणि शिक्षण मंत्र्यांकडे पाठपुरावा केला असता या सर्वांनी सागर राजगुरूस अनुकंपा तत्त्वावर नेमणूकत्रून घेण्याबाबत शिक्षण प्रसारक मंडळाला अर्थात मुख्याध्यापकांना कळविले होते. परंतु, पदाधिकारी आणि मुख्याध्यापक यांनी वरिष्ठ कार्यालयाचे आदेश डावलून नेमणुकीस टाळाटाळ केली होती. त्यानंतर टेंभुर्णी पोलिसांत जनता विद्यालयालयाच्या मुख्याध्यापक आणि शिक्षण प्रसारक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली; मात्र त्यांनीही गुन्हा दाखल केला नव्हता.