सोलापूर: अल्पवयीन मुलीस फूस लावून अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी अजय उर्फ विजय रघुनाथ चव्हाण (वय २०, रा. राहुल गांधी झोपडपट्टी, सोलापूर) यास ७ वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपयांचा दंड सुनावला. जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय. जी. देशमुख यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली.
फिर्यादीच्या दुकानामध्ये आरोपी अजय हा कामास होता. त्याने आपले मित्र संतोष किसन चव्हाण आणि राहुल महादेव चव्हाण यांच्या मदतीने फिर्यादीच्या मुलीशी सूत जमवले. यातच त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाल्याने पीडित मुलीला पळवून नेले. जाताना फिर्यादीच्याच घरातील १ लाख २ हजार रुपयांची रोकड, ५ तोळे सोन्याच्या पाटल्या, ५ तोळे सोन्याच्या अंगठ्या आणि मोबाईल चोरून नेला.
फिर्यादीची मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही आरोपीने तिच्याशी जबरदस्तीने लग्न करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. यातील मदत करणाºया दोघांपैकी संतोष चव्हाण हा आरोपीचा काका आणि राहुल चव्हाण हा मित्र आहे. त्यांनी या गुन्ह्यासाठी आरोपीला मदत केली. पोलिसांनी आरोपीविद्ध भा. दं. वि. ३६३, ३६६ अ, ३७६ सह ३४ आणि बाललैंगिक अत्याचारापासून संरक्षण २०१२ च्या कलम ४ अन्वये गुन्हा नोंदवला.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत, मूळ फिर्यादीतर्फे अॅड. राजकुमार म्हात्रे, अॅड. लक्ष्मीनारायण कोटा यांनी काम पाहिले. आरोपीकडून अॅड. एस. आर. गडदे यांनी काम पाहिले. यासाठी तपासी अंमलदार फौजदार विशाल दांडगे व कोर्ट पैरवी हवालदार शिवानंद मैंदर्गी यांनी मदत केली.
साक्षींसह सीसीटीव्ही फुटेज ठरले महत्त्वपूर्ण- या खटल्यामध्ये सरकार पक्षाकडून नऊ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी फिर्यादी, अल्पवयीन मुलगी, नेत्र साक्षीदार, डॉक्टर, तपासिक अंमलदार फौजदार विशाल दांडगे आणि फिर्यादीच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज आदी साक्षीपुरावे महत्त्वपूर्ण ठरले. याशिवाय जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी अजय उर्फ विजय चव्हाण याला भा. दं. वि. ३७६ व बाललैंगिक अत्याचार संरक्षण २०१२ च्या कलम ४ अन्वये ७ वर्षांची शिक्षा व दहा हजारांचा दंडही सुनावला. दंडाची रक्कम न भरल्यास ३ महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतील ५ हजार रुपये पीडित मुलीस नुकसानभरपाई म्हणून द्यावेत, असेही निकालात नमूद केले आहे.