कुर्डूवाडी : सांगोल्यातील दागिने चोरी प्रकरणात हव्या असलेल्या शंकर गोंडीबा गुंजाळ, धनाजी साहेबराव गुंजाळ, दिलीप साहेबराव गुंजाळ या तीन संशियतांना पकडण्यासाठी गेलेले स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांच्या पथकावर बारलोणी (ता. माढा) येथे शुक्रवारी सकाळी अकरा वाजता जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात तीन पोलीस जखमी झाले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
हल्लेखाेरांनी गावाबाहेर पलायन केले आहे. यात ११ मुख्य आरोपींबरोबरच इतर ५० जणांवर कुर्डूवाडी पोलिसांत सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेतील फरार आरोपींना शोधण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके नेमली आहेत. यामध्ये कुर्डूवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांच्या पथकाला राहुल सर्जेराव गुंजाळ (वय २२ ), यशवंत दशरथ गुंजाळ (वय ३०), अनिल दशरथ गुंजाळ (वय ४१) हे फरार आरोपी बारलोणी-कव्हे रस्त्यावर आढळले. त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बारलोणीतील घटनेनंतर अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी गावाला वेढा देऊन कोम्बिंग ऑपरेशनही केले होते; पण त्या दिवशी एकही आरोपी हाती लागला नाही.
घटना घडल्याच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी सहायक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे, पोलीस हवालदार प्रवीण दराडे, पोलीस नाईक सागर सुरवसे, दत्ता सोमवाड, ओम दासरे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे कव्हे रस्त्यावर तीन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना माढा न्यायालयापुढे हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.