सोलापूर : औद्योगिक वसाहत उपक्रेंदातील वीज कर्मचा-यावर प्राणघातक हल्ला केल्याचा कृती समितीच्या वतीने निषेध नोंदवत पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांना भेटून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
कुमठा नाका परिसरात महाराणा प्रताप झोपडपटटी येथील विद्युत लाईनवरील झाडाच्या फांद्या तोडण्याकरिता वायरमन ट्रान्सफॉर्मर बंद करून काम करित होते. त्या भागातील एका वीज ग्राहकाने औदयोगिक वसाहत उपकेंद्र येथे फोन करून प्रधान यंत्रचालक झुल्फीकार शेख यांना जाब विचारला. त्यांनी काम चालू असल्याचे सांगितले. दीड तासांत वीजपुरवठा पूर्ववत होईल सांगताच फोनवरुन अरेरावी सुरू केली.
दरम्यान दुपारी ४ वाजेच्या दरम्यान संबंधीत वीज ग्राहक उपकेंद्राच्या आवारात येऊन शेख यांना धमकावीत 'मॅच चालु झाली आहे, तुम्ही मुद्दामहुन लाईन बंद केली' म्हणत स्ट्रीट लाईटचा लोखंडी पाइप घेऊन धावला. तो डोक्यात न बसता मानेवर बसला. या हल्ल्यात शेख हे बेशुद्ध पडले. त्यानंतर इतर कर्मचा-यांनी त्यांना बेशुद्ध अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल केले.
अलीकडे वीज कर्मचा-यांवर असे वारंवार हल्ले होत आहेत. कर्मचारी हे भितीच्या सावटाखाली काम करताहेत. संबधीत आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करुन अटक करावी अन्यथा संयुक्त कृती समितीच्या वतीने काम बंद आंदोलन करेल असा ईशारा दिला. यावेळी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशनचे विलास कोले, म. रा. मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे एन. टी. मुजावर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन दिले.