अक्कलकोट : नागुरे (ता. अक्कलकोट) येथील तांड्यावर रसायनमिश्रीत हातभट्टी दारू निर्मित केंद्रावर धाड टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर केलेल्या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना दि.१५ एप्रिल रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेत २० ते २५ जणांविरुद्ध अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील १५ आरोपीना तात्काळ अटक करण्यात पोलिसाना यश आला आहे.
नागुरे लमाण तांड्यावर रासायनिक मिश्रीत हातभट्टी दारू निर्मितीचे केंद्र आहे. सध्या कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र संचारबंदी आहे. या दिवसात सुद्धा दारू निर्मिती काम चालू असल्याची गुप्त बातमी सहायक पोलीस निरीक्षक गणेश मस्के यांना मिळाली होती. त्यावरून त्या भागाचे पोलीस हवालदार मुल्ला यांना आदेश देऊन कारवाई करण्यासाठी सांगितले होते. त्यानुसार पो. ह. ए. बी. मुल्ला, पो. कॉ. ए. एस.पटेल, पो. ना. एन. टी. वाकिटोळ, पोलीस मित्र दिलीप जोगदे, वैजीनाथ किणी यांच्या पथकाने रात्री ८ वाजण्याच्या सुमारास कारवाईसाठी सदर ठिकाणी गेले होते.
कारवाई घटनास्थळी कारवाईसाठी चाललेल्या हालचाली पाहून राजू शिवू चव्हाण यांच्या घरासमोर बसलेल्या एक महिल पळत घराच्या पाठीमागे गेली. तेव्हा जाऊन पाहिले असता, १०० लिटर हातभट्टी दारू मिळून आली. ते जप्त करीत असताना कुपेंद्र निलू राठोड यांनी समोर येऊन पोलिसांना तुम्ही प्रत्येक वेळी येता आणि दारू नुकसान करून जाता, हे एक दिवशी तुम्हाला महागात पडेल असा इशारा देऊन हुज्जत घालत होता. तेव्हा दिलीप चव्हाण, राजू राठोड, युवराज चव्हाण, रवी राठोड, नितीन राठोड, सागर राठोड, अमोल चव्हाण, राजू चव्हाण, दिपील चव्हाण, अमित चव्हाण, विशाल चव्हाण, आकाश राठोड, हणमंत चव्हाण, संतोष राठोड, दिलीप चव्हाण असे १५ जणासह ७ ते ८ लोकांनी एकत्रित येऊन हातातील काठ्या, दगडे घेऊन पोलिसांना घेरावा घातला आणि दगड, काठ्याने मारहाण करण्यास सुरवात केली. त्यानंतर वाढीव कर्मचारी बोलावून घेतले असता, पळून गेले. त्याप्रसंगी पोलिसांच्या अंगावरील दोन तोळ्याचे ६८ हजार किंमतीचे लॉकेट, १२ हजार किमतीचे मोबाईल काढून घेतले आहे. अशी तक्रार जखमी पोलीस कॉ दादासाहेब श्रीमंत बोडके यांनी दिली आहे. जखमी पोलीस ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट येथे उपचार घेत आहे.
आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय जाधव हे करीत आहेत. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ संतोष गायकवाड, पोनि विजय जाधव, सपोनि गणेश मस्के, सपोनि राठोड, पो उपनिरीक्षक बेरड यांनी भेट दिली.