सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील भोजप्पा तांडा येथे 'कोरोना' पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने हा भाग सील करण्यास आलेल्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकावरच एका तरुणाने हल्ला केल्याची घटना शनिवारी दुपारी साडेचार वाजता घडली.
सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रयोगशाळेकडून जिल्ह्यातून तपासणी केलेल्या रुग्णांचे अहवाल शनिवारी दुपारी जिल्हा आरोग्य विभागास प्राप्त झाला, त्यामध्ये उत्तर सोलापूर तालुक्यातील भोजप्पा तांडा येथील एक व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार तालुका वैद्यकीय अधिकारी एस. पी. कुलकर्णी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी गोडसे हे तांड्याची तपासणी करून प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यासाठी सरकारी जीपमधून निघाले होते. तांडा प्रवेशद्वारावर एका तरुणाने गाडी अडवली व तुम्ही कोण अशी विचारणा केली, त्यावेळी डॉक्टर गोडसे यांनी तालुका आरोग्य अधिकारी आले आहेत. गावात कोरोना रुग्ण आढल्यामुळे तपासणी करुन हा भाग सील करण्यात येणार असल्याचे त्याला सांगितले, त्यावर त्या तरूणाने आमच्या तांड्यावर कोरोणा रुग्ण नाही, बदनामी करता काय, चला चालते व्हा इथून म्हणून डॉ. गोडसे यांना धक्काबुक्की केली. डॉ. कुलकर्णी समजावून सांगत असतानाही त्यांच्या अंगावर तो धावून आला. त्यामुळे डॉक्टरांनी सलगरवस्ती पोलिसांना फोन केला.
पोलीस येत नाहीत असे पाहून हे पथक परत निघाले होते, वाटेत सलगरवस्ती पोलिसांची व्हॅन आली व पोलिसांनी तांड्यावर जाऊन त्या तरुणास ताब्यात घेतले आहे. मात्र डॉक्टरांनी पुढील कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे ग्रामस्थांची अडचण झाली आहे. संबंधित तरुणाने एक महिन्यापूर्वी सर्वेक्षणास आलेल्या आशा कर्मचाऱ्यावरही अशाच प्रकारे हल्ला केला होता. त्याच्याशी अरेरावी करून हातातील रजिस्टर सोडून टाकले होते असे यावेळी सांगण्यात आले. झेडपी चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांना ही घटना समजल्यावर त्यांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.