सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील भोजप्पा तांडा येथे डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्या पिता- पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. ही घटना भोजप्पा तांड्यावर शनिवारी घडली होती.
राहुल राठोड व रतन राठोड असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. भोजपूर तांडा येथे प्रतिबंधित क्षेत्र तपासणी गेल्यावर डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याचा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष उमेश पाटील यांनी निषेध केला आहे व कोरोना प्रतिबंधासाठी काम करणाऱ्या डॉक्टरांना संरक्षण देण्याची मागणी पोलिस आयुक्तांकडे केली आहे. डॉक्टरांच्या संघटनेने ही पोलीस संरक्षण दिल्यावरच काम करण्याची भूमिका घेतली आहे.
दरम्यान जखमी डॉ. आनंद गोडसे यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. त्यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी भेट घेऊन विचारपूस केली.
लोकमत ब्रेकिंग नंतर सूत्रे हललीभोजप्पा तांडा येथे डॉक्टरांच्या पथकावर हल्ला झाल्याचे वृत्त लोकमत ऑनलाइनवर झळकताच राज्याच्या आरोग्य विभागाने याची दखल घेतली. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनीही सलगरवस्ती पोलिसांना आरोपीवर कडक कारवाईचे आदेश दिले पोलीस निरीक्षक पवार यांनी तातडीने हालचाल करून आरोपींना ताब्यात घेतले.