कुर्डूवाडी : सांगोला येथील सराफाला लुटणाऱ्या आरोपींना बारलोणीत पकडण्यास गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलिसांवर हल्ला चढवून जमावाने अटक केलेल्या आरोपीला पळवून लावले. या हल्ल्यात तिघे पोलीस जखमी झाले. या प्रकरणी ५० जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा नोंदला आहे.
जमावाने केलेल्या दगडफेकीमुळे अक्षय दळवी, धनराज गायकवाड आणि धनाजी गाडे हे तिघे पथकातील जखमी पोलिसांचा समावेश आहे.
सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकास खबऱ्यामार्फत सांगोल्याच्या सराफाला लुटणारे आरोपी माढा तालुक्यातील बारलोणी येथे असल्याची खबर मिळाली. पथकाने नियोजन करून लवाजम्यासह शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास बारलोेणीत पोहोचले.
संशयित आरोपी शंकर गोंडीबा गुंजाळ, धनाजी साहेबराव गुंजाळ, दिलीप साहेबराव गुंजाळ हे तिघे गावातील हनुमान मंदिरासमोरील कट्ट्यावर बसलेले दिसले. यावेळी पथकाने त्यांच्यासमोर गाडी थांबवत त्यातील दोघांना ताब्यात घेतले, परंतु पोलीस पथक असल्याचे आरोपींनी आरडाओरडा करून नातलगांना जमवले. महिलांचा मोठा जमाव पोलिसांवर धावून आला. पोलीस व्हॅनवर दगडफेक करून पोलिसांच्या ताब्यातील दोघांची सोडवणूक करून पळवून लावले. जमाव मोठ्या संख्येने असल्यामुळे पोलीस काही करू शकले नाहीत. कुडूर्वाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदला आहे.