सांगोला-सोलापूर महामार्गावर चौकात बँक ऑफ इंडियाचे एटीएम सेंटर आहे. या एटीएम सेंटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे व सुरक्षारक्षक अशी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही. विशेष म्हणजे लाईट सुद्धा नाही. ही बाब हेरून चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री या एटीएममध्ये प्रवेश केला. मशीनचा वरचा भाग फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला, मात्र त्यांना खाली असणारी कॅश काढता आली नाही. यामुळे चोरटे प्रयत्न करून पसार झाले.
सकाळी हा प्रकार उघडकीस आला. आंधळगाव येथील पोलीस पाटील यांनी बँकेचे मॅनेजर राजेश टाक यांना घटनेबाबत माहिती दिली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांनी भेट दिली. एटीएम सुरक्षेसाठी सिक्युरिटी अलार्म बसविण्याच्या सूचना बँक मॅनेजर टाक यांना दिल्या. संबंधीत एजन्सीने यासंबंधी अद्याप फिर्याद दिली नाही.
---
काही दिवसांपूर्वीही असाच प्रकार
सांगोला -सोलापूर महामार्गावर ब्रम्हपुरी येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम काही महिन्यांपूर्वी फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना पकडण्यात अद्याप यश आलेले नाही. त्यानंतर आंधळगाव चौकातील एटीएम फोडून चोरट्यांनी पोलिसांनाच आव्हान दिले आहे.
-----
सुरक्षा व्यवस्थेचे वावडे
कोविड काळापासून अनेक बँकांच्या एटीएम सेंटरमध्ये सीसीटीव्ही, लाईट तसेच सुरक्षारक्षक नाहीत. राष्ट्रीयीकृत बँकांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे चोरट्यांनी अशा एटीएमना लक्ष्य केले आहे.
----
आंधळगाव येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला आहे. या एटीएममध्ये असणारी २८ लाख ९ हजार ८०० रुपये रक्कम सुरक्षित आहे.
- राजेश टाक, मॅनेजर, बँक ऑफ इंडिया, शाखा लक्ष्मीदहिवडी