कुर्डूवाडी : येथील पाठक ज्वेलर्सचे सराफ मालक शुभंकर सुरेंद्र पाठक (वय-२६, रा. जैन मंदिराराजवळ, कुर्डूवाडी) हे आपल्या तानाजी सलगर या कामगाराबरोबर एमएच-४५, यू-७४८९ या दुचाकी गाडीवरून दुकानातील सोन्या चांदीच्या मालाच्या बॅगा घेऊन जैन मंदीराजवळ असणाऱ्या घराकडे जात होते.
गुरुवारी सायंकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पाठीमागून अचानकपणे अज्ञात तीन चोरट्यांनी येऊन त्यांना हाक मारत पाठीमागे बसलेल्या कामगाराच्या डोळ्यात चटणी टाकली व जवळ असणाऱ्या पिस्तुलचा धाक दाखवत सोने चांदीच्या बॅगा लुटण्याचा प्रयत्न केला. या प्रकार लगेच लक्षात आल्याने अगदी हाकेच्या अंतरावर राहिलेल्या घराकडे पाहत शुभंकर पाठकने एकच आरडाओरड सुरू केला व त्या अज्ञात चोरट्यांच्या हातातून तावडीतून सुटका करून घेतली व घरात सोन्या चांदीच्या सर्व बॅगासह धाव घेतली व सुटकेचा निश्वास टाकला. त्यामुळे येथील सोनारावर सायंकाळच्या वेळच्या गर्दीच्या ठिकाणी धाड टाकण्याचा असफल प्रयत्न अज्ञात चोरट्यांचा झाला असला तरी शहरात मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत रात्री उशिरापर्यंत कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. मात्र पोलीस ठाण्यात शहरातील व्यापाऱ्यांनी एकच गर्दी केली होती. व घटनेवर येथील पोलीस मात्र सारवासारव करण्याचे प्रयत्न करत असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या त्यांच्याविषयीच्या तीव्र भावना दिसून आल्या.
याबाबत अधिक माहिती अशी की, कुर्डूवाडी येथील सराफी चौकात शुभंकर सुरेंद्र पाठक यांचे सराफाचे मोठे दुकान आहे.नेहमीप्रमाणे ते पावणे आठ वाजता आपल्या कामगाराला घेऊन दुकानातील माल घरी घेऊन जात होते.त्यावेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीवरून अज्ञात तिघांनी हा हल्ला त्यांच्यावर केला आहे.त्यातून त्यांनी सुटका करून घेतली आहे. यामुळे अज्ञात हल्लेखोरांपासून ते लाखो रुपयांच्या चोरीपासून वाचले आहेत.
कुर्डूवाडी शहरात याअगोदरही मागील काही महिन्यात अश्याच एक दोन घटना घडल्या आहेत.त्याही घटनेतील अज्ञात हल्लेखोरांनी पिस्तुलचा धाक दाखवून एका सोनाराच्या बॅगा पळविण्याचाच प्रयत्न केला होता. अद्यापपर्यत त्यातील एकही आरोपी सापडला नाही. या वारंवार घडणाऱ्या घटनेमुळे शहरात मात्र चोरट्याविषयी भीती व्यक्त होऊ लागली आहे. याकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी येथील व्यापाऱ्यांतून होत आहे. या घटनेबाबत कुर्डूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे व सहायक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांना संपर्क साधला असता त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही.