याबाबत तलाठी प्रकाश पांडुरंग गायकवाड (रा. कडलास, ता. सांगोला) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी ऋषी बाबर, योगेश बाबर, महिपती बोराडेसह अनोळखी इसम अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तहसीलदार अभिजीत पाटील यांच्या आदेशान्वये हातीद मंडलाधिकारी धनंजय इंगोले, जवळा तलाठी संभाजी जाधव, घेरडी तलाठी कुमाररवी राजवाडे, बलवडी तलाठी दिनेश सोणूने, सोनंद तलाठी प्रकाश गायकवाड यांचे पथक मंगळवारी सोनंद गावातील जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे कोरडा नदी पात्रामध्ये अवैध वाळू चोरीविरुद्ध कारवाई करत होते. तेथे एक टेम्पो व ट्रॅक्टरमध्ये काही लोक अवैधरित्या वाळू भरून जात होते. दरम्यान महसूल पथकाला पाहून पळून जाताना पथकातील कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर थांबविण्यासाठी त्याच्या पाठीमागे गेले व टेम्पोचा पाठलाग करत सोनंद ते औंढी रस्त्यावरील शिवाजीनगर पाटीजवळ तो टेम्पो पकडला. यावेळी चालक वाहन सोडून पळून गेला.
पकडलेले वाहन पुढील कारवाईसाठी तहसील कार्यालयाकडे घेऊन जात असताना सोनंद येथील ऋषी सतीश बाबर, योगेश सतीश बाबर, महिपती अभंगा बोराडे यांच्यासह एक अनोळखी इसम एमएच ४५/२७६५ या (स्कार्पिओ) कारमधून आले. यावेळी ऋषी बाबर यांनी तलाठी प्रकाश गायकवाड यांना टेम्पोतून धरून खाली ओढून याला मारा, असे इतर साथीदारांना भडकावून त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सदर वाहनाची पुढील चाके तलाठी गायकवाड यांच्या उजव्या बाजूच्या खुब्याला घासून गेल्याने खुब्याजवळ जखम होऊन ते खाली पडले. त्यावेळी चौघांपैकी तिघेजण कारमधून तर योगेश बाबर हा लाल-पिवळ्या रंगाच्या ४०७ टेम्पोमध्ये अवैधरित्या चोरून भरलेल्या वाळूसह तेथून पळून गेला.