बार्शी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बार्शी शहर व तालुक्यातील लोकांना आरोग्यसेवा देण्याकरिता बार्शी नगर परिषदेच्या सध्या बंद असलेल्या जवाहर रुग्णालयाच्या इमारतीत नवीन कोविड केअर सेंटर उभारून उपचार देण्यात येणार असल्याची माहिती आ. राजेंद्र राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तत्पूर्वी आ. राजेंद्र राऊत यांनी प्रांताधिकारी हेमंत निकम, नगराध्यक्ष आसीफभाई तांबोळी, तहसीलदार सुनील शेरखाने, मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील, गटविकास अधिकारी शेखर सावंत, तालुका प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ.अशोक ढगे, ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. शीतल बोपलकर, डॉ. प्रकाश बुरगुटे, डॉ. कैवल्य गायकवाड यांच्यासोबत जवाहर रुग्णालयाची पाहणी करून बैठक घेतली.
बैठकीत लवकरच ५० बेडचे कोविड केअर सेंटर व त्यापैकी ३० ऑक्सिजन बेडचे सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सध्या कोरोनाच्या प्रकोपाची परिस्थिती पाहता प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या अधिकारात एक वर्षाच्या कालावधीसाठी जवाहर रुग्णालयाचे हस्तांतरण, खासगी सुविधा डॉ. प्रकाश बुरगुटे व डॉ. कैवल्य गायकवाड यांच्याकडे करण्यात येणार आहे.
आ. राऊत म्हणाले, सध्या बार्शी तालुक्यात जगदाळे मामा हॉस्पिटल, कॅन्सर हॉस्पिटल, सोमाणी हॉस्पिटल, डॉ अंधारे यांचे सुश्रुत हॉस्पिटल, शहा हॉस्पिटल येथे कोविड केअर सेंटर सुरू आहेत. सध्या बार्शीतील कोविड सेंटरवर बार्शी तालुका व आजूबाजूच्या पाच- सहा तालुक्यांतील रुग्णांचा ताण आहे. यामुळे भविष्यातील गरज पाहता आणखी २०० ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
नगर परिषदेच्या जवाहर हॉस्पिटलसंदर्भात बोलताना म्हणाले की, पूर्वी शासन निर्णयानुसार निवृत्त कर्मचारी व तज्ज्ञांची नियुक्ती करता येत नसल्याने हे हॉस्पिटल बंद आहे. नगर परिषदेच्या वापरातील प्रियदर्शनी इमारतीची दुरुस्ती करून तेथे तात्पुरती सोय करण्यात येणार आहे. तसेच जुन्या जवाहर हॉस्पिटलची इमारत वापरण्यास योग्य आहे की नाही याची तांत्रिक तपासणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणार आहे. त्यांच्या अहवालानुसार त्याची दुरुस्ती करून ती इमारत पुन्हा वापरण्यात येईल.
---
दर निश्चितीअभावी हॉस्पिटलचे काम रखडले
या पद्धतीने शहरातील बंद असलेले जवाहर हॉस्पिटल पुन्हा सुरू करण्याकरिता नगर परिषदेने केलेल्या ठरावानुसार या इमारतीत सेवाभावी संस्था, खाजगी हॉस्पिटलच्या माध्यमातून नागरिकांकरिता आरोग्य सेवा सुरू केल्यास ही इमारत त्यांना देण्याची तयारी होती; परंतु त्रिसदस्यीय समितीचा दर निश्चितीविषयी निर्णय न झाल्याने तो प्रश्न प्रलंबित आहे. आचारसंहिता संपल्यानंतर लवकरच त्रिसदस्यीय समितीच्या बैठकीत याविषयी निर्णय घेऊन नाममात्र भाडे आणि अनामत रक्कम जमा करून जवाहर हॉस्पिटलमार्फत पुन्हा एकदा नागरिकांना आरोग्य सेवा देण्यात येणार असल्याचे राजेंद्र राऊत यांनी सांगितले.