अक्कलकोट : सोलापुरातील अक्कलकोट शहर व तालुक्यात काही गावांमध्ये मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर औरंगजेबाचे स्टेटस ठेवून तालुक्यातील वातावरण आणि सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे. संबंधितांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी काल विधानसभेत केली. याप्रकरणी संबंधितांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचीही त्यांनी मागणी केली आहे.
आमदार कल्याणशेट्टी यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, "शहर व तालुक्यात काही गावांत मागील काही दिवसांपासून सतत असे प्रकार घडत आहेत. यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडत आहे. याप्रकरणी गृह विभागाकडून कारवाईचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी कल्याणशेट्टी यांनी केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून औरंगजेबाचे स्टेटस ठेवणाऱ्यांवर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी," अशी मागणी केली आहे.
मैंदर्गी येथील १३ जणांविरूद्ध कारवाई
विधानसभेच्या अधिवेशनात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी औरंगजेबाचे स्टेटस ठेवण्यावरून कारवाईची मागणी केली होती. त्याची तत्काळ दखल घेत दक्षिण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मैंदर्गी येथील १३ जणांविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये केवळ दोघेजण सज्ञान असून, उर्वरित अल्पवयीन असल्याचे सांगण्यात आले.