Praniti Shinde :सोलापुरात आमदार प्रणिती शिंदेंच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न; भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 08:54 AM2024-03-22T08:54:59+5:302024-03-22T08:56:05+5:30
Praniti Shinde :आमदार प्रणिती शिंदे यांचा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावभेट दौरा सुरू आहे, काल दौरा सुरू असताना त्यांच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Praniti Shinde ( Marathi News ) : सोलापूर- काँग्रेसकडून सोलापूर लोकसभेसाठी आमदार प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसापासून आमदार शिंदे लोकसभेसाठी गावभेट दौरा करत आहेत. काल गुरुवारी दिवसभर पंढरपूर तालुक्यात दौरा सुरू होता, सायंकाळी सरकोली गावाजवळ आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाहनावर हल्ला झाल्याचा आरोप केला आहे. याबाबत सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, या व्हिडीओत आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाहनाची तोडफोड करण्याचा जमाव प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. यावेळी आमदार शिंदे संतापल्याचे दिसत आहे. त्या कारमधून खाली येऊन 'माझ्या गाडीला हात लावायचा नाही', असं बोलत असल्याचे दिसत आहेत.
मनसेच्या वाट्याला तीन, दोन की एक जागा? शिंदे-फडणवीस-राज यांच्यात दीड तास गुफ्तगू
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसापासून आंदोलन सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंदोलक नेत्यांना गावात येऊ देत नाही, नेत्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू आहेत. दरम्यान, काल आमदार प्रणिती शिंदे चळे गावात गेल्या होत्या, यावेळी त्या गावातील ग्रामस्थांशी चर्चा करत होत्या. यावेळी मराठा आरक्षणाच्या घोषणा सुरू झाल्या. यानंतर काही वेळ गोंधळ झाला, यावेळी दोन्हीकडून बाचाबाची झाल्याचे दिसत आहे.
भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला: आमदार प्रणिती शिंदे
"माझ्या गाडीवर हल्ला करणारी भाजपची लोक होती. ती लोक मराठा आंदोलक नव्हती, एवढ्या चांगल्या आंदोलनाचे भाजप वापर करत आहे. भाजपची लोक आंदोलकांच्या नावाने हे सगळं करत होते. माझ्या गाडीची तोडफोड करण्याचा प्रयत्न करत होते, एका महिला आमदारावर ते हल्ला करत होते. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात जे चांगलं मराठा आंदोनाचा संघर्ष सुरू आहे, त्या आंदोलनाला ही लोक गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही आमदार प्रणिती शिंदे यांनी केला.
सोलापुरात आमदार प्रणिती शिंदेंच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न; भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप#PranitiShinde#Congresspic.twitter.com/KR9CDN7Wc4
— Lokmat (@lokmat) March 22, 2024