बार्शी : तीन वर्षांपूर्वी विवाह झालेल्या महिलेस सासरच्या लोकांनी शारीरिक व मानसिक त्रास देऊन दोन वेळा गर्भपात करावयास लावला. तसेच तिला फिनेल पाजून घर खरेदीसाठी माहेरहून २० लाख रुपये आणण्यासाठी मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी बार्शी शहर पोलिसात पतीसह आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत ऐश्वर्या नीलेश पवार (वय २८, रा. गोकूळनगरी, कल्याण, ठाणे, सध्या भवानी पेठ बार्शी) हिने बार्शी पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी भादंवि ४९८, अ, संमतीवाचून गर्भपात ३१३ व हुंडाबळी अधिनियम कलम ३ प्रमाणे पती नीलेश मधुकर पवार, सासू सिंधू मधुकर पवार (दोघे रा. कडेगाव जि. सांगली, नणंद भारती रणसिंग, अलका थोरात, अंजली थोरात, भाची सोनाली थोरात, सासरे मधुकर पवार, दीर संतोष पवार (दोघे रा. कडेगाव) यांच्याविरुद्ध शुक्रवारी रात्री गुन्हा नोंदला आहे.
पोलीस सूत्रांनुसार डिसेंबर २०१८ मध्ये लग्न झाल्यानंतर दीड महिन्यातच करणीधरणी व मानधन यावरून पतीसह सर्वांनी किरकोळ कारणावरून मानसिक छळ व सांगितलेले काम न केल्यास पतीकडे तक्रार करू नको नाहीतर माहेरी पाठविण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. सर्व सहन करूनही घरातील कामे कोण करणार याचे कारण पुढे करून जून २०१९ व डिसेंबर २०१९ मध्ये दवाखान्यात नेऊन दोन वेळा बळजबरीने गर्भपात करावयास लावला. तेथेही डॉक्टरसमोर बोललीस तर जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर तिला कल्याण येथे जबरदस्तीने विषारी औषध पाजले. त्रास होऊ लागल्याने दवाखान्यात दाखल केले. ती आजारी असल्याचे कारण वडिलांना सांगून बोलावले आणि माहेरी पाठविले. त्या वेळी घर खरेदीसाठी २० लाख रुपये घेऊन येण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास फौजदार स्वप्निल पवार करीत आहेत.
---