सोलापूर : शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी ५० टक्के शिक्षकांनाच शाळांमध्ये उपस्थित राहण्याचे बंधन घालण्यात आले आहे. या तुलनेत मुख्याध्यापक अथवा उच्च महाविद्यालयाचे प्राचार्य यांची अवघी १० टक्के उपस्थिती राहणार आहे.
कोविड-१९ च्या परिस्थितीमुळे पुढील सूचनेपर्यंत शाळा बंद असल्यातरी शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे.
राज्याचे शिक्षण संचालक द.गो.जगताप यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सुरू झालेल्या शैक्षणिक वर्षांसाठी राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत नियमावली जाहीर केली आहे.
इयत्ता १ ली ते इयत्ता ९ वी व इयत्ता ११ वीच्या वर्गाला शिकवणारे ५० टक्के शिक्षक उपस्थित राहतील. इयत्ता १० वी व इयत्ता १२ वीच्या वर्गाला शिकवणारे १०० टक्के शिक्षक शाळेत उपस्थित राहण्याची सक्ती करण्यात आली आहे. लिपिक, शिपाई , प्रयोगशाळा सहायक आदी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १०० टक्के उपस्थितीचे बंधन घालण्यात आले आहेत.
प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी १० टक्के उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे.
इयत्ता १० वी आणि इयत्ता १२ वीच्या वर्गाचा निकाल तयार करण्यासाठी मूल्यांकनाचे काम सुरू असून मर्यादित वेळेत हा निकाल घोषित करावयाचा असल्याने अशा सर्वच शिक्षकांना शाळेत १०० टक्के उपस्थित राहण्याची सक्ती करण्यात आली आहे. या काळात विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरळीतपणे सुरू राहील याची दक्षता सर्वच शिक्षकांना घ्यावी लागणार आहे.