दुधनीची कोणतीही निवडणूक असो चर्चा आणि तक्रार होतच असते. सध्या कै. सातलिंगप्पा म्हेत्रे यांचे निधन झाल्याने प्रभाग १ मधील नगरसेवकाची जागा रिक्त झाली आहे. त्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. त्याची प्रारूप मतदार यादी गेल्या आठवड्यात प्रशासनाने तयार केली होती. त्यावर नगरसेवक महेश पाटील, बसवराज हौदे व हणमंत कलशेट्टी या तिघांनी वेगवेगळे तक्रारी अर्ज दाखल केले होते. त्यावर बुधवारी दुपारी ३ वाजता दुधनी नगरपालिकेत मुख्याधिकारी आतिष वाळुंजे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यामध्ये एकूण हरकतींपैकी तब्बल ४८ मतदार तक्रारदाराच्या तक्रारींची दखल घेऊन कमी करण्यात आले.
तिघांनी तक्रारीत म्हटले होते की, २७ नोव्हेंबर-१६ रोजी दुधनी न. प. निवडणुकीत २९ डिसेंबर-१८ रोजी प्रभाग २ च्या पोटनिवडणुकीत २६ फेब्रुवारी-१८ रोजी प्रभाग-४ च्या पोटनिवडणुकीत नमूद मतदारांनी वेगवेगळ्या ठिकाणी मतदान केले आहे. आता त्यांची नावे प्रभाग-१ मधील यादीत कशी काय आली, अशा १३० मतदारांच्या नावांवर हरकतींद्वारे आक्षेप घेतला होता. त्यावर बुधवारी दुपारी सुनावणी झाली. त्यामध्ये ४८ नावे कमी करण्यात आली. यामुळे वातावरण निवळण्यास मदत झाली आहे.
सुनावणीवेळी प्रशासनाचे मुख्याधिकारी आतिष वाळुंजे, कार्यालयीन प्रमुख चिदानंद कोळी, बीएलओ रामचंद्र हत्ते, कर विभागप्रमुख चनमल पाटील तसेच नगरसेवक महेश पाटील, बसवराज हौदे, बाबा टक्कळकी, हणमंत कलशेट्टी, गुरुशांत कोळी, गुरुशांत बुळगोंडा आदी उपस्थित होते.
-----