पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात १७ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी ३८ उमेदवारांनी ४४ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीत काही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अवैध झाल्यानंतर ३० अर्ज वैध ठरले. १ ते ३ एप्रिल अर्ज माघारी घेण्याची मुदत होती. मात्र १ तारखेला एकाही उमेदवाराने अर्ज माघारी घेतला नाही. शुक्रवारी रंगपंचमीची सुटी होती त्यामुळे अर्ज माघारी घेता आले नाहीत. निवडणुकीत राष्ट्रवादी महाविकास आघाडीकडून भगीरथ भालके, भाजपाकडून समाधान आवताडे, स्वाभिमानीकडून सचिन शिंदे-पाटील तर शिवसेनेच्या बंडखोर नेत्या शैला गोडसे बहुजन विकास आघाडीकडून निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास स्पष्ट दिसतेय. यांच्याव्यतिरिक्त आणखी तब्बल २६ अपक्ष अर्ज दाखल आहेत.
परिचारक समर्थक माजी नगराध्यक्ष नागेश भोसले व भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांनी शेवटच्या टप्प्यात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आघाडी प्रमाणे भाजपासमोरही आपल्या समर्थक अपक्षांचे आव्हान कायम आहे. या अपक्षांनी उमेदवारी अर्ज माघारी घ्यावेत यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरु आहेत.
या पोटनिवडणुकीत चार प्रमुख उमेदवार राहणार निश्चित असले तरी अर्ज माघारी घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवार भोसले, आवताडे काय भूमिका घेतात, अन्य कितीजण माघार घेतात याबद्दल सर्र्वांनाच उत्सुकता आहे.
प्रचाराचे नारळ फुटले, आरोप-प्रत्यारोप सुरू..
निवडणुकीचे खरे चित्र शुक्रवारी स्पष्ट होणार असले तरी महाविकास आघाडीचे भगीरथ भालके, भाजपाचे समाधान आवताडे यांनी नेते, प्रमुख कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत श्रीफळ फोडून आपल्या प्रचाराला सुरवात केली आहे. अपक्ष शैला गोडसे यांनी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीवर आपला भर ठेवला आहे तर स्वाभिमानीच्या प्रचाराच्या शुभारंभासाठी स्वत: राजू शेट्टी रविवारी पंढरपुरात येत आहेत. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.