काशिनाथ वाघमारे, सोलापूर : यंदाच्या आषाढी यात्रेत पंढरपूर सुंदर दिसाव, भाविकांना पंढरपुरात आल्यानंतर प्रसन्न वाटावे यासाठी शहरातील विविध भागात आकर्षक अशी विद्युत रोषणाई करणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.पंढरपूर येथे आषाढी यात्रेनिमित्त जिल्हाधिका-यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मंदीर समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर, उप विभागीय अधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, पालखी सोहळ्यातील प्रमुख व्यक्ती उपस्थित होते.
या बैठकीत पूर्ण पालखी मार्ग, पालखीतळ, रिंगण सोहळा आधी विषयी वारकऱ्यांनी सूचना केल्या होत्या. गॅस सिलेंडर मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात यावा अशी देखील सूचना वारकऱ्यांनी या बैठकीदरम्यान मांडली आहेत. यंदाच्या आषाढी यात्रेत भाविकांना आवश्यक त्या चांगल्या सोयी सुविधा पुरवणार आहे. चंद्रभागा वाळवंट व ६५ एकर परिसरात विद्युत रोषणाई, लेजर शो करण्यात येणार आहे. आत्तापर्यंतची बेस्ट वारी म्हणून यंदाची वारी करण्याचा आमचा प्रयत्न असणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले. वाढीव अनुदानाची मागणीसध्या चारपट जादा पाऊस जून पर्यंत झाला आहे. यामुळे पालखी स्थळ व रिंगण सोहळ्याच्या मैदानावर चिखल होऊ नये यासाठी मुरूम टाकण्यात येणार आहे. यासाठी शासनाकडे निधी मागण्यात येणार आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद व नगरपरिषदेला यात्रा अनुदान वाढवून मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.