पंढरपूर : राज्यभरातील वारकरी संप्रदायातील महाराज मंडळींनी एकमताने श्री विठ्ठलाच्या सशुल्क दर्शनाचा ठराव करून दिल्यास एक दिवसात सशुल्क दर्शनाची आपण अंमलबजावणी करू, असे आश्वासन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिले.
राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाल्यानंतर डॉ. अतुल भोसले हे बुधवारी प्रथमच पंढरपुरात आले होते. श्री विठ्ठल मंदिरामध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, सर्वात जास्त भाविकांची गर्दी असलेल्या देशातील पहिल्या १५ मंदिरांमध्ये राज्यातील शिर्डी आणि पंढरपूर या देवस्थानांचा समावेश झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी केंद्र सरकार विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देणार आहे. टोकन दर्शन सुविधा हा त्याचाच एक भाग आहे. अधिक महिना संपल्यानंतर म्हणजेच जूनअखेर श्री विठ्ठलाची टोकन दर्शन व्यवस्था सुरू करणार असून ही व्यवस्था प्रायोगिक तत्त्वावर असेल़ टोकन दर्शन व्यवस्थेसाठी शहरात विविध ४० ठिकाणी आपण टोकन सुविधेचे काऊंटर सरू करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या सर्वच कामांचा दर्जा चांगला रहावा, यासाठी आपण समिती गठित करणार आहे़ यामध्ये स्वच्छता समिती, लाडू प्रसाद समिती आणि भक्तनिवास समितीचा समावेश असणार आहे. शहरातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींचा या समित्यांमध्ये समावेश असेल, असेही त्यांनी सांगितले.
खास बाब म्हणून मंत्रिपद - पंढरपुरात श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने जास्तीत जास्त सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची कामे शासनस्तरावर जलदगतीने मार्गी लागावीत, यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना खास बाब म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यमंत्री पदाचा दर्जा देऊ केलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी मंदिर समितीच्या अध्यक्षपदाची आपणावर जबाबदारी देऊन त्याला राज्यमंत्री पदाचा दर्जा देऊ केलेला आहे़ याचा उपयोग निश्चितच भाविकांना जास्तीत जास्त सोयीसुविधा देण्यासाठी करू, असे आश्वासन डॉ़ अतुल भोसले यांनी दिले़