सोलापूर: गरिबांचा पैसा वसूल करण्यासाठी बड्या थकबाकीदारांच्या मालमत्तेचा लिलाव करा असे फर्मान सोडत वसुलीत सुधारणा नाही केली तर तुम्हाला घरी बसावे लागेल, असा इशारा खासदार शरद पवार यांनी जिल्हा बँकेच्या संचालकांना दिला.
सोलापूर जिल्हा बँक शतक महोत्सवी सोहळा कार्यक्रमात पवार यांनी बँकेच्या वसुलीचा पाढा वाचत चिंता व्यक्त केली. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकांकडेच मोठ्या प्रमाणावर थकबाकी असून मोठ्या थकबाकीदारांकडील वसुली करण्यासाठी कोणाचीही गय करू नका असे पवार यांनी अध्यक्ष राजन पाटील यांचे नाव घेऊन सांगितले. शेती अन् शेतकरी निगडीत घटकांच्या हातात संस्था असल्या पाहिजेत असे पवार म्हणाले. कर्जमाफीचा निर्णय चांगला परंतु काही सुधारणा झाल्या पाहिजेत असे ते म्हणाले.
ऐपत असूनही कर्ज भरत नाहीत, वसुलीचे प्रमाण वरचेवर कमी होतेय हे चांगले नाही, घेतलेले कर्ज परत करण्याची सवय गरजेची आहे, एन.पी.ए. ९ टक्क्यांपेक्षा कमी असला पाहिजे परंतु सोलापूर जिल्हा बँकेचा एन.पी.ए. ३१ टक्के असून रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार संचालकांना घरी बसावे लागेल असे खा. पवार म्हणाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बँकेच्या १०० वर्षांच्या प्रगतीचा आढावा घेणाºया शताब्दी अर्थक्रांतीची’ या स्मरणिकेचे प्रकाशन,मोबाईल बँकिंग सेवा, शरद बळीराजा शताब्दी ठेव योजनेची सुरुवात करण्यात आली. मोहोळ नागरी पतसंस्थेने एक कोटी, लोकनेते कारखान्याने २५ लाख, औंढी विकास सोसायटी व अन्य विकास संस्थांनी शरद बळीराजा ठेव योजनेत ठेव ठेवल्याबद्दल सत्कार करण्यात आला. बँकेचे माजी अध्यक्ष, जि.प. अध्यक्ष संजय शिंदे, माजी आ. दिलीप माने, माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
अडचणीत पाटील-जगताप यांनी बँकेला सावरले
- - बाबुरावअण्णा पाटील व नामदेवराव जगताप हे हातात हात घालून दिसायचे,अडचणीतील जिल्हा बँक या दोघांच्या चिरंजीवांनी राजन पाटील व जयवंतराव जगताप यांनी सावरल्याचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांनी कौतुकाने सांगितले.
- - राज्यातील बंद असलेले ४० साखर कारखाने सुरू करण्यासाठी पवार साहेबांची मदत घेणार असल्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी यावेळी बोलताना सांगितले.
- - प्रास्ताविकात बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी शासनाच्या धरसोड धोरणामुळे थकबाकी वाढल्याचे सांगून मागील दोन वर्षांत झालेल्या सुधारणाची आकडेवारी मांडली.
- - राज्यातील २२ हजारांपैकी ११ हजार विकास सोसायट्या बंद आहेत, १० गुंठ्यापेक्षा अधिक क्षेत्र असलेल्या प्रत्येक शेतकºयाला विकास सोसायटीचा सभासद करुन घ्या, राजकारण न आणता प्रत्येक शेतकºयाला कर्ज वाटपाची जबाबदारी आपली असल्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी बँकेच्या पदाधिकाºयांना उद्देशून सांगितले.