काशिनाथ वाघमारे, सोलापूर : मागील वर्षीप्रमाणे यंदाही ' हर घर तिरंगा ' अभियान राबविले जाणार आहे. नागरिकांना राष्ट्रध्वज उपलब्ध व्हावा, या उद्देशाने भारतीय डाक विभागाने त्यांच्या सर्व कार्यालयांमध्ये राष्ट्रध्वजाची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूरमधील जिल्हा डाक कार्यालयाने १२ हजार ध्वज मागविले आहेत. याशिवाय जिल्ह्यात ग्रामपंचायती, पंचायत समित्या, शासकीय कार्यालयांनाही २५ रुपयांत ध्वज पोहोचवले जात आहे.स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ' हर घर तिरंगा ' अभियान सुरू करण्यात आले आहे. २०२२ मध्ये देशभरातील २३ कोटी नागरिकांनी स्वत:च्या घरावर प्रत्यक्ष तिरंगा फडकविला होता. या उपक्रमात टपाल विभागाने मोठे योगदान दिले होते.
यावर्षीही देशभक्तीची हीच भावना समोर ठेवून भारत सरकारने १३ ते १५ ऑगस्ट या काळात ' हर घर तिरंगा ' अभियान राबविण्याचे निश्चित केले आहे. यासाठी भारतीय टपाल कार्यालयातून राष्ट्रध्वजांची विक्री सुरू करण्यात येणार आहे. www.epostoffice.gov.in या संकेतस्थळावर ई-टपाल सुविधेच्या माध्यमातून २५ रुपयांत राष्ट्रध्वज घेता येणार आहे.सेल्फी काढून अपलोड करा फोटो..
मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही राष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाच्या या कार्यक्रमाशी नागरिक जोडले जावेत म्हणून टपाल कार्यालयाने ' हर घर तिरंगा ' हा उपक्रम सुरू केला आहे. नागरिकांना त्यांच्या घरावर तसेच कार्यालयांवर फडकवलेल्या राष्ट्रध्वजासह सेल्फी फोटो #indiapost4Tiranga, #HarDilTiranga. #HargharTiranga या हॅशटॅगसह समाज माध्यमांवर अपलोड करता येईल.तिरंग्यासाठी जवळच्या पोस्टात जा..
हर घर तिरंगा २.० अंतर्गत पोस्ट विभाग भारताचा राष्ट्रध्वज पुरवत आहे. राष्ट्रध्वजाचा आकार २० इंच x ३० इंच (ध्वज खांबाशिवाय) आहे. हा ध्वज आपण आपल्या नजीकच्या पोस्ट ऑफिसमधून मिळवू शकता.