सोलापूर : संचारबंदीनिमित्त रस्त्यावर असलेल्या पोलीस कर्मचाºयांना दररोज मोफत भाजीपाला दिला जात आहे. सध्याची गरज ओळखून बीबीदारफळच्या शेतकºयाने स्वत:च्या पैशातून हा उपक्रम सुरू केला आहे.
विजयकुमार पांडुरंग साठे (वय ३३) हे बीबीदारफळ येथील शेतकरी आहेत. गावात त्यांना चार एकर शेती आहे. कोरोनामुळे शहर व जिल्ह्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हातावरचे पोट असणाºया लोकांची सध्या तारांबळ उडाली आहे. या स्थितीचा विचार करून एक महिन्यापूर्वी विजयकुमार साठे यांनी पाकणी व अन्य गावांतील हातावर पोट असलेल्या लोकांना ज्वारी, तेल व भाजीपाला वाटप केला.
हे करत असताना त्यांनी रस्त्यावर जागोजागी थांबलेल्या पोलिसांचा विचार केला. हे पोलीस २४ तास जनतेसाठी रस्त्यावर उभे आहेत, त्यांनाही आपण भाजीपाला दिला पाहिजे असा विचार केला.
स्वत:चे शेत असले तरी त्यांनी जवळचे अडीच ते तीन हजार रुपये खर्चून गावातील अन्य शेतकºयांकडून दररोज टोमॅटो, वांगी, शेवगा, भेंडी, मिरची, गवारी असा भाजीपाला पिशवीत घालून दररोज २00 ते २५0 पिशव्या तयार करू लागले. या पिशव्या ते मोहोळ पोलीस स्टेशन, महामार्गावर रस्त्यावर ड्युटी करणारे पोलीस, तालुका पोलीस स्टेशन, ठिकठिकाणी बंदोबस्तासाठी उभे असलेल्या पोलिसांना देण्यास सुरूवात केली.
पोलीस हे काय आहे...आम्हाला कशाला देताय असे म्हणत होते. पण शेतकरी प्रेमाने देत असल्याचे पाहून व घरी याची गरज आहे हे ओळखून पोलीस कर्मचारी भाजीपाला स्वीकारू लागले. गेल्या एक महिनाभरापासून विजयकुमार साठे हे भाजीपाला मोफत वाटत आहेत.
कधी चारचाकी तर कधी मोटरसायकलवर- दररोज सकाळी भाजीपाला गोळा करणे, पिशव्यांमध्ये भरणे व तो वाटण्यासाठी बाहेर पडणे हा विजयकुमार साठे यांचा दिनक्रम आहे. या कामाला गावातील शैलेश नानासाहेब चवरे, गणेश दिलीप पवार, समाधान विठ्ठल चवरे, संदीप देवकुळे, अविराज साठे, सचिन पवार, निखिल दुर्लेकर, गणेश साठे, मनोज साठे, राम जाधव, आकाश देवकुळे ही मित्रमंडळी सोबत फिरून मदत करीत आहेत. मित्राच्या बोलेरो जीपमधून तर कधी स्वत:च्या मोटरसायकलवरून ही मंडळी दुपारपर्यंत भाजी वाटप करतात आणि समाधानाने घरी निघून जातात. ग्रामीण पोलिसांकडून सत्कार- विजयकुमार साठे यांचा प्रामाणिकपणा पाहून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे यांच्या हस्ते सत्कार करून आभार मानण्यात आले.
पोलीसदेखील माणूसच आहे : विजयकुमार साठे- पोलीस हा वर्दीत असल्यामुळे लोकांना तो वेगळा वाटतो, मात्र तोही एक माणूस आहे. सकाळ म्हणायचं नाही, रात्र बघायची नाही. जिथे ड्युटी लागेल तिथे जायचं. मुलाबाळांचा विचार करायचा नाही. आपत्ती नैसर्गिक असो की कृत्रिम संरक्षणासाठी पोलिसांनाच पुढे यावे लागते. सध्या पोलीसच आपल्या रक्षणासाठी रस्त्यावर आहेत, याची जाणीव ठेवून मी माझ्या परीने भाजीपाला वाटप करीत आहे अशी माहिती तरूण शेतकरी विजयकुमार साठे यांनी दिली.