कुरुल : सोलापूर ते कोल्हापूर या सध्या चालू असलेल्या चारपदरी महामार्गावर वाहतूक सुरळीतपणे चालावी, कामती भागातील ऊस वाहन धारकांना, तसेच लहान-मोठ्या वाहन चालकांना वाहन चालवणे सोयीचे व्हावे म्हणून कामती बुद्रुक येथील भोसले - टेळे वस्ती या ठिकाणी सर्कल किंवा क्रॉसिंग पॉईंट बनविण्यात यावा, यासाठी कामती बुद्रुक येथे सोमवारी सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी विपत यांनी, या मागणीच्या पार्श्वभूमीवर समिती नेमून त्यानंतर निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.
सोलापूर - कोल्हापूर या नवीन महामार्गावर मोहोळवरून आलेली सर्व वाहतूक तसेच स्थानिक वाहने ब्रीजखालून न जाता ती वाहने कामती येथून टेळे - भोसले वस्तीजवळ सर्कल अथवा क्रॉसिंग पॉईंट करावा, ही मागणी गेल्या दोन वर्षांपासून स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याकडे लेखी व तोंडी स्वरूपात अनेकदा केली होती.
----
यावेळी कामतीचे सरपंच रामराव भोसले, पंचायत समिती सदस्या सुनीता भोसले, नागेश व्हनकळसे, महादेव गोडसे, हर्षल देशमुख, प्रवीण भोसले, गोरख खराडे, बाळकृष्ण कुलकर्णी, प्रकाश पारवे, संजय कस्तुरे, नितीन खराडे, सुनील गायकवाड, संजय वाघमोडे, रामचंद्र खराडे, समाधान भोसले, दत्तात्रय भोसले, दयानंद भोसले, शंकर खराडे, विजय पवार, विनोद भोसले, छत्रगुण गुरव, माऊली भोसले, शंकर खराडे, नजीर बागवान, अंकुश टेळे, मारुती टेळे, दादा खराडे, किरण नकाते आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कामती पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने व पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवून नंतर वाहतूक सुरळीत चालू केली .
------
सोलापूर - कोल्हापूर महामार्गावर कामती बु. येथे सर्कल करण्यासाठी सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी महामार्ग प्राधिकरणचे अनिल विपत यांना निवेदन देताना शैला गोडसे, प्रभाकर देशमुख, रामराव भोसले, दीपक माळी, बाळासाहेब दुबे पाटील, अशोक भोसले, सुनीता भोसले आदी दिसत आहेत.
----
काय आहे आंदोलकांचे म्हणणे...
- यावेळी जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांनी, हे सर्कल न झाल्यास वाहतुकीला अडचण निर्माण होऊन अपघात होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. जिल्हा परिषद सदस्या शैला गोडसे यांनी, आठ दिवसात सर्कलचे काम न झाल्यास भागातील जनतेसाठी पुन्हा रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगितले. तसेच जिल्हा दूध संघाचे संचालक दीपक माळी यांनी, रस्ते बनविणाऱ्या अधिकाऱ्यांनी गावापासून दीड किलोमीटर अंतरावर स्टॉप बनविले असल्याने त्याचा गावाला कोणताही फायदा होणार नसल्याचे सांगून, हायवेशेजारील गावांच्या सरपंचांना विश्वासात घेऊन काम करायला हवे, असे मत यावेळी व्यक्त केले.
यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख अशोक भोसले, सिद्धाराम म्हमाणे, बाळासाहेब डुबे - पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.