सध्या कोविड पॉझिटिव्ह झालेल्या रुग्णांना योग्य ते वैद्यकीय उपचार देण्याबरोबरच त्याबाबतची मानसिकता बदलणे व आजूबाजूच्या परिसराच्या परिस्थितीत बदल करून सर्वतोपरी त्या रुग्णांची इच्छाशक्ती वाढवणारी सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे गरजेचे आहे. यामुळे ते रुग्ण तर लवकरात लवकर बरे होण्यास मदत होते शिवाय त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देखील समाजातून मोठा आधार मिळतो. सध्याच्या कठीण प्रसंगात सोशल मीडियावर नागरिकांनी नकारात्मक, भीतीदायक पोस्ट न करता धीर देणाऱ्या सकारात्मक पोस्ट करण्याचे आवाहन होऊ लागले आहे.
‘घाबरु नका, स्वतःची योग्य काळजी घ्या’ हा संदेश देणाऱ्या व ‘कोरोनातून आपण नक्कीच बरे होऊ शकतो’ या प्रकारच्या पोस्ट जर सोशल मीडियातून रुग्णांनी वाचल्या गेल्या तर त्यांना आधार मिळून लवकर बरे होण्यासाठी मदत होईल, अशी अपेक्षा होऊ लागली आहे.
..................
सध्याच्या परिस्थितीत आम्हाला सकारात्मक ऊर्जा महत्त्वाची आहे.आम्ही विलगीकरणात असल्याने औषध उपचाराबरोबरच एक विरंगुळा म्हणून मोबाईलवर असतो,परंतु सध्या अनेक ग्रुपवरील भयानक पोस्ट पाहिल्यानंतर पुन्हा मनात भीती निर्माण होत आहे.
-एक कोरोनाग्रस्त रुग्ण.
----
सोशल मीडियावर भयानक पोस्ट करताना लोकांनी काळजी घ्यावी. कोरोना व्यतिरिक्त इतर चांगल्या पोस्ट कराव्यात. आपणास ज्ञात नसलेल्या व कॉपी पेस्ट केलेल्या अशा पोस्ट करु नयेत. उलट प्रेरणात्मक व सकारात्मक विचार पोस्ट करायला हव्यात. त्याही हलक्या-फुलक्या व आनंददायी पोस्ट असाव्यात.
- डॉ. रोहित बोबडे, कुर्डूवाडी
----