मोहोळ : वडवळ येथे शेतकऱ्यांना ई-पीक नोंदणी मोबाईल अॅपद्वारे करण्यासाठी रिक्षामधून ध्वनिक्षेपकाच्या सहाय्याने जनजागृती करण्यात येत आहे. शेतकरी वर्गातून प्रतिसाद मिळत आहे. वडवळ येथे मंडल अधिकारी निहाल नदाफ, तलाठी समाधान कांबळे, सरपंच जालिंदर बनसोडे, पोलीस पाटील दादा काकडे यांच्या उपस्थितीत रिक्षाद्वारे जनजागृती करण्यात आली.
यामध्ये प्रत्यक्ष शेतात जाऊनच पिकाचा फोटो घ्यावा लागतो. सध्या खरीप हंगामाची नोंदणी सुरू आहे. मात्र काही शेतकऱ्यांकडे बी.एस.एन.एल.चे सीमकार्ड आहेत. मात्र नेटवर्क सेवा विस्कळीत झाल्याने ही माहिती वेळेवर भरता येत नसल्याचे शेतकरी विनायक गरड, श्रीकांत शिवपुजे यांनी सांगितले.
---
मुदतवाढ पण द्या..
काही शेतकऱ्यांकडे मात्र स्मार्ट फोन नाहीत. ज्यांच्याकडे आहेत त्यांना ही माहिती कशी भरावी माहीत नसल्याने प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्यास खऱ्या अर्थाने या मोहिमेस गती मिळेल. तसेच याला अजून थोडी मुदतवाढ मिळायला हवी अशी अपेक्षा शेतकरी विष्णू करे, बाळू कोळी यांनी व्यक्त केली.
----
शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा हा विषय आहे. भविष्यात सर्व योजना व लाभाकरिता ही पीक नोंदणी वरदान ठरणार आहे. जर ई-पीक पेरा नोंदणी केली नाही तर शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. गावोगावी आढावा घेत आहोत.
- राजशेखर लिंबारे
तहसीलदार, मोहोळ
-----
फ़ोटो : १७ वडवळ
वडवळ येथे ई-पीक नोंदणीकरिता रिक्षाद्वारे जनजागृती करताना तलाठी समाधान कांबळे, पोलीस पाटील दादा काकडे.