सोलापूर : सर्वांचा लाडका बाप्पा काही दिवसातच आपल्या घरी येणार आहे. एकीकडे बाप्पांच्या आगमनाची आतुरता लागली असतानाच बाळे येथील युवा चित्रकार प्रतीक तांदळे यांनी आपल्या अर्ध्या एकर शेतीमध्ये बाप्पांची दोनशे फुटी गणरायाची प्रतिमा साकारली आहे़ दीड महिन्याच्या परिश्रमामुळे शेतात हिरवाईने नटलेला गणपती सर्वांचे आकर्षण ठरत आहे.
कोरोनामुळे सर्व कामकाज ठप्प झाले होते, त्याकाळात लॉकडाऊनमुळे सर्वजण घरी होते़ यामुळे चित्रकार तांदळे याने अभिजय गायकवाड, राघव शिंदे, बॉबी तोडकरी, वैभव कोळी, बालाजी राजुरे, ओंकार राजुरे या आपल्या मित्रांसमवेत शेतामध्ये गणेशाची मूर्ती साकारण्याची संकल्पना मांडली़ याला सर्वांनी होकार दिला आणि ५ जुलै रोजी गणेशाची मूर्ती साकारण्यास सुरूवात केली.
दरम्यान, जमिनीवर चित्र कोरण्यासाठी १५ दिवस गेले त्यानंतर चित्रावर गहू, गवत व आळीव पेरले. पेरणीसाठी २ ते ३ दिवसांचा कालावधी लागला. दरम्यान, झालेल्या मुसळधार पावसाने आळीव वाहून गेले़ जमिनीवर काढलेले चित्रही नाहीसे झाले. त्यानंतर चित्रकार तांदळे आणि त्यांच्या मित्रांनी पुन्हा चित्र साकारून आळीवाची पेरणी केली.
पाहण्यासाठी गर्दीचित्रकार तांदळे हे गणेशोत्सवात पर्यावरणपूरक ‘श्री’ मूर्ती साकारतात. यंदा त्यांनी हा अभिनव प्रयोग केला. ते जेव्हा शेतात ‘श्री’ची भव्य प्रतिमा जमिनीवर पेरणीच्या सहाय्याने साकारत होते. तेव्हा त्यांच्या या उपक्रमाबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. प्रतिमेतील गणपतीची उंची २०० फूट इतकी भव्य आहे. शिवाय रूंदीही १५० फूट आहे. तांदळे यांचा पहिला प्रयत्न यशस्वी नाही; पण जिद्दीने त्यांनी आपल्या मित्रासमवेत जमिनीवरील चित्रावर आळीव, गहू पेरला. आठ दिवसात ते उगविल्यानंतर अत्यंत कलात्मकतेने ते कापून घेतले अन् देखणी ‘श्री’ मूर्ती साकारली. आता ही मूर्ती पाहण्यासाठी गर्दी होत आहे.