सोलापूर : घरबसल्या डॉक्टरांकडून मोफत सल्ला घेण्यासाठी सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘ई-संजीवनी ओपीडी’च्या माध्यमातून एक उत्तम पर्याय दिला आहे. आता या ओपीडीत आयुर्वेदिक सल्लाही मिळणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील २०० आयुर्वेदिक डॉक्टर जुळले आहेत.
राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये ‘ई-संजीवनी ऑनलाइन मोफत ओपीडी’ सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. या माध्यमातून कोणताही गरजू नागरिक घरीच राहून आपल्या आरोग्याविषयी ‘संजीवनी ओपीडी’ या ॲपद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांसोबत मोफत सल्लामसलत करू शकतो, तज्ज्ञ डॉक्टरांचा मोफत सल्ला मिळवू शकतो. या उपयुक्त अशा उपक्रमाचा अनेकांनी लाभ घेतला.
-------
ऑनलाईन ओपीडीसाठी इथे करा नोंदणी
घरबसल्या डॉक्टरांचा सल्ला मिळविण्यासाठी रुग्णांना ऑनलाइन नोंदणी करावी लागते. http://esanjeevaniopd.in/ या वेबसाईटवर नोंदणी करता येते.
----
तज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद
सोमवार ते रविवार सकाळी ९ ते दुपारी १ आणि दुपारी १.४५ ते सायं. ५.०० या वेळेमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद साधून या सेवेचा लाभ घेता येईल. यामध्ये ‘एसएमएस’द्वारे ई-प्रिस्क्रिप्शनही रुग्णांना प्राप्त होते. ते ई-प्रिस्क्रिप्शन दाखवून रुग्ण नजीकच्या सरकारी रुग्णालयातून औषधे घेऊ शकतात.
----
२०० डॉक्टरांचा सल्ला मिळणार
ई-संजीवनी ओपीडीसाठी सध्या २०० हून अधिक डॉक्टरांचा सल्ला मिळणार आहे. निमा संघटनेचे शहरात ११०० तर जिल्ह्यात २३०० डॉक्टर आहेत. ई-संजीवनी ओपीडीला डॉक्टरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. येत्या काळात अधिकाधिक डॉक्टर उपक्रमात सहभागी होणार आहेत.
जिल्ह्यातील सर्वच डॉक्टरांना ई-संजीवनी ओपीडीसाठी नोंदणी करण्यास सांगितले आहे. विविध आजारांवर चांगले उपचार करणारे डॉक्टर यात सहभागी होत आहेत. यामुळे रुग्णांना घरबसल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळणार आहे. याचा रुग्णांनी लाभ घ्यावा.
- डॉ. विनायक टेंभुर्णीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, निमा संघटना
*******