सोलापूर : बीए आणि बीकॉम झालेल्या विद्यार्थ्यांना थेट एमएस्सीची पदवी घेता येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सुरू करण्यात आलेल्या या नव्या विद्याशाखा बदल अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.
कला व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना शास्त्र शाखेतून पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी यापूर्वी प्रवेश मिळत नव्हता. आता सोलापूर विद्यापीठाकडून बीए, बीकॉम झालेल्या विद्यार्थ्यांना एम.कॉम व एम.एस्सी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. बीए, बीकॉमच्या विद्यार्थ्यांना एमएस्सीतून पदवी घेण्यासाठी दोन महिने कालावधीचा फाउंडेशन कोर्स अर्थात पायाभूत अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणे आवश्यक आहे. पायाभूत अभ्यासक्रम करण्यासाठी सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या कोर्सच्या माध्यमातून गणित, संख्याशास्त्र, संगणकशास्त्र, पर्यावरणशास्त्र आणि भूमाहितीशास्त्र या विषयांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येणार आहे. फाउंडेशन कोर्स पूर्ण करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एमएस्सी अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येणार आहे.
यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार संधी
अनेक विद्यार्थी इंग्रजी व अन्य विषयातून बीएच्या पदवीचे शिक्षण पूर्ण करतात. त्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन एमएस्सीतून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेऊन करिअर करावयाचे असते, मात्र तशी संधी त्यांना नसते. त्यामुळे आता विद्यापीठाकडून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार तशी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.