प्रभू पुजारी
सोलापूर : बा विठ्ठला...क्षमा कर, यंदाची वारी चुकवतोय, धरणीमायची सेवा करीत शेतातच अभंग म्हणतोय, अशी भावना तमाम शेतकरी वारकरी व्यक्त करीत आहेत.
१२ जून रोजी जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि १३ जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने वाटचाल करणार होते. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पायी वारी सोहळा रद्द झाला आहे़ प्रत्येकवर्षी पालखी सोहळ्यात सहभागी होण्यापूर्वी अनेक वारकरी पंढरीत येऊन पांडुरंगाचे दर्शन घेतात़ नंतर वारीत सहभागी होतात़ त्यामुळे पालखी सोहळा प्रस्थानापूर्वी ही देवनगरी वारकºयांनी फुललेली असते़ पण यंदा शुकशुकाट आहे.
आषाढी जवळ आली की, यामध्ये सहभागी होण्यासाठी वारकरी तयारी करतो. महिनाभर नाही म्हणून तो शेतातील सर्व कामे उरकतो़ पालखी सोहळा प्रस्थानापूर्वी दोन दिवस अगोदरच आपली बॅग भरतो़ कपाळी गोपीचंद टिळा, हातात भगवी पताका, मुखी विठ्ठल-रखुमाईचे नामस्मरण करीत मिळेल त्या वाहनाने पंढरी गाठतो.
आषाढी सोहळ्यात गर्दीमुळे आपले दर्शन होणार नाही म्हणून रांगेतून पांडुरंगाचे दर्शन घेतो़ एकदाचे पदस्पर्श दर्शन झाले की मग काही वारकरी देहूला संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात तर काही भाविक आळंदीला संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मार्गस्थ होतात़ या प्रस्थानापूर्वी पंढरीत वारकºयांची, दुकानदारांची लगबग सुरू असते; मात्र यंदा कोरोनामुळे पंढरीत वारकºयांअभावी सर्वत्र शुकशुकाट आहे़ कोरोनामुळे वारीच रद्द झाल्याने जाता येत नाही म्हटल्यावर शेतातच खरीप हंगामाच्या पेरणीची तयारी करीत आहोत, या शेतातील कामाच्यावेळीच विठ्ठलाचे नामस्मरण करीत असल्याचे दत्तात्रय गुंड, नेमाण्णा पुजारी यांनी सांगितले.
डोळ्यासमोर तरळू लागले ते दृश्य- पंढरपुरातील आषाढी वारीची लगबग... टाळ, मृदंगाचा आवाज... ओ माऊली, ओ माऊली अशी हाक़... बोला पुंडलिक वरदा हरी...ची घोषणा... भाविकांच्या मुखी विठ्ठल, विठ्ठल असे नामस्मरण... ओ माऊली पेढा घ्या, मेवा-मिठाई घ्या असा दुकानदारांचा आग्रह़...माऊली गोपीचंदाचा टिळा, अष्टगंध, बुका लावून घ्या म्हणणारे मुले... चोरांपासून सावध रहा, रांगेतूनच दर्शन घ्या, चुकले असाल तर...येथे संपर्क साधा, असे प्रबोधन करणारे पोलीस कर्मचारी... हे आषाढी वारीतील दृश्य सध्या डोळ्यासमोर तरळू लागले आहे, असे अनेक वर्षे न चुकता वारी करणारे धनंजय कलागते, विष्णू केंदळे, लक्ष्मण सुरवसे, विठ्ठल शेवाळे यांनी सांगितले़
कोरोनामुळे वारी रद्द झाली़ त्यामुळे आता जाता येत नाही म्हणून शेतातील कामातच विठ्ठलाचे नामस्मरण करतो़ आषाढी आली की, कितीही महत्त्वाची कामे असली तर वारीच्या ओढीने ती कामे सोडून निघून जातो़ यंदा जाता येत नसल्याचे दु:ख आहे़- चंद्रकांत पाटील,वारकरी
मी शिक्षक होतो़ निवृत्तीनंतर धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्राकडे वळलो़ वयाची सत्तरी पूर्ण केली असली तरी शक्यतो वारी चुकवित नाही़ यंदा कोरोनामुळे वारी चुकवावी लागत आहे़ परंतु गावी प्रवचन, भजन या माध्यमातून प्रबोधन करीत आहे़- दत्तात्रय चव्हाण महाराजवारकरी, टेंभुर्णी