करमाळा शहरातील किल्ला वेस, दगडी रोड, मोहल्ला गल्ली, सुतार गल्ली, पुणे रोड, फंड गल्ली, कानाड गल्ली, दत्तपेठ, भवानी पेठ, राशीन पेठ, कुुंकूगल्ली, वेताळ पेठ, भीमनगर, वीरचौक, खडकपुरा, मेन रोडसह रहदारीच्या व वर्दळीच्या रस्त्यावर जुने वाडे व मोडकळीस आलेल्या तब्बल ४८ इमारती धोकादायक बनल्या आहेत.
पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर पालिकेच्या बांधकाम विभागाकडून इमारतीची पाहणी करून धोकादायक ठरवण्यात येतात. गतवर्षी पालिकेने ५८ इमारती धोकादायक ठरवल्या होत्या. इमारत मालकांना नोटिसा दिल्याने १० इमारत मालकांनी त्या इमारती उतरवून घेतल्या. यंदाच्या परीक्षणामध्ये ४८ इमारती धोकादायक ठरवल्या असून, त्या इमारतीवर धोक्याची सूचना देणारे फलक पालिकेने लावले आहेत. जाहीर प्रसिद्धीकरण व लेखी नोटीसही इमारत मालकांना दिल्या आहेत.
----
न्यायप्रविष्टमुळे जुन्या इमारती ‘जैसे थे’
बहुतांशी धोकादायक इमारतीसंबंधी मालक व भाडेकरू, असा वाद आहे. त्यामुळे इमारत उतरवून घेण्यात अडचणी येत आहेत. काहींनी न्यायालयात धाव घेतलेली आहे. अशा इमारतीसंबंधी पालिकेलाही निर्णय घेता येत नाही. यामुळे धोकादायक इमारत ‘जैसे थे’ आहेत.
धोकादायक इमारतीत नागरिक वास्तव्यास आहेत पावसामुळे त्या कोणत्याही क्षणी कोसळू शकतात, याची कल्पना त्या इमारतीमध्ये राहणाऱ्यांनाही आहे; परंतु नाइलाजाने ते त्यात राहतात. यावर आता ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता आहे; परंतु हा निर्णय घेणार कोण, असा प्रश्न आहे.
-----
शहरात ४८ इमारती धोकादायक आहेत. इमारत मालकांनी या इमारती त्वरित नष्ट करणे गरजेचे आहे. खरं तर नगर परिषदेस त्या इमारती काढून टाकण्याचा अधिकार आहे; पण आपण संधी देतो. धोकादायक इमारतीचा आसपासच्या रहिवाशांना धोका असेल, तर पालिकेस कळवावे.
-वीणा पवार, मुख्याधिकारी, नगर परिषद, करमाळा
-------
करमाळा शहरातील किल्लावेससमोर मोडकळीस आलेली धोकादायक इमारत.
-----