सोलापूर : श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसरात प्राणिसंग्रहालयाजवळ बुधवारी १० फेब्रुवारी दुपारी मगर आढळल्याचा दावा स्थानिकांनी केला. आधी गडदुरे कुटुंबातील दोन भावडांना ती दिसली. त्यानंतर दोघांपैकी एकाने आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात मगरीला कैदही केले. दरम्यान, गुरुवारी सकाळपासून वन विभागाचे पथक मगरीची शोधमोहीम हाती घेणार आहे.
काशीनाथ गडदुरे व कार्तिक गडदुरे ही मुले रेवणसिद्धेश्वर मंदिरासमोरील मैदानात शेळ्या चारण्यासाठी गेले होते. काही शेळ्या या तिथे असलेल्या मोठ्या खड्ड्याजवळ गेल्याने त्यांना परतविण्यासाठी काशीनाथ व कार्तिक गेले असता त्यांना मगर दिसली. त्यांनी लगेच आपल्या मोबाइलमध्ये मगरीचे फोटो काढले. मगरीला चाहूल लागल्याने तिने लगेच खड्ड्यामध्ये धाव घेतली. ही दोनही मुले शेळ्यांना घेऊन आपल्या घरी परतली. त्यांचे आजोबा प्रकाश गडदुरे यांना मगर पाहिल्याचे सांगून मगरीचे फोटोही दाखविले. प्रकाश गडदुरे यांनी वन विभागाला या घटनेची माहिती दिली. काही वेळानंतर वन परिमंडल अधिकारी शंकर कुताटे हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी प्राथमिक पाहणी करून प्रत्यक्षदर्शींशी चर्चा केली. अंधार पडल्यामुळे मगरीचा शोध घेण्याचे थांबवत गुरुवारी पुन्हा मोहीम सुरू करणार असल्याचे कुताटे यांनी सांगितले.
मगर असल्याच्या पुराव्यांचा शोध
परिसरातील नागरिकांनी मगर दिसल्याचा दावा केला आहे, तरीदेखील वन विभागातर्फे मगर असल्याच्या पुराव्यांचा शोध घेण्यात येणार आहे. मगरीच्या पावलांचे ठसे, ती सरपटत गेल्याच्या खुनांचा शोध घेतला जाणार आहे. गरज पडल्यास देगावप्रमाणे परिसरात कॅमेरे लावूनही मगर असल्याचा शोध वन विभागातर्फे घेतला जाऊ शकतो. एकदा मगर असल्याचे निश्चित झाल्यानतर तिला पकडण्यासाठी वन विभागाच्या वरिष्ठ पातळीवरून परवानगी घेण्यात येणार आहे.
मगर प्राणिसंग्रहालयातील असण्याची शक्यता
काही वर्षांपूर्वी या मैदानामध्ये शेतीला पाणी देण्यासाठी प्रकाश गडदुरे यांनी १० फूट खोल खड्डा केला होता. या खड्ड्यामध्ये गटाराचे पाणी आहे. या खड्ड्यातच मगर राहत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मगरीची लांबी अंदाजे तीन ते साडेतीन फूट असल्याचे ते म्हणाले. मागील काही वर्षांपूर्वी महात्मा गांधी प्राणिसंग्रहालयातून काही मगरी बाहेर पडल्या होत्या. देगावच्या नाल्यामध्येही एक मगर पकडण्यात आली होती. रेवणसिद्धेश्वर मंदिराच्या मैदानात आढळलेली मगर ही प्राणिसंग्रहालयातूनच आल्याचा अंदाज वन्यजीवप्रेमींनी व्यक्त केला.
एका बाजूने नाला बंद करण्याची सूचना
रेवणसिद्धेश्वर मंदिराच्या मैदानामधून एक नाला वाहतो. हा नाला प्राणिसंग्रहालयाच्या मागच्या बाजूला (स्मशानभूमीकडे) जातो. या परिसरात दलदल असल्यामुळे मगरीचा शोध घेणे अशक्य होईल. त्यामुळे मगर पलीकडे जाऊ नये म्हणून एका बाजूने नाला बंद करावा, अशी सूचना वन्यजीवप्रेमींनी केली.