साेलापूर : महापालिकेच्या नव्या बाबा गाडीला रविवारी पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवशी १२८ मुले आणि १०९ माेठ्या व्यक्तींनी बाबा गाडीतील सफरीचा आनंद लुटला.
स्मार्ट सिटी याेजनेतून सिद्धेश्वर मंदिर ते गणपती घाट रस्त्याचे सुशाेभीकरण करण्यात आले. या मार्गावर सुंदर झाडे आणि शाेभेचे दिवे आहेत. स्मार्ट सिटी कंपनीने या भागाचे रुपडे पालटले आहे. या भागात भुईकाेट किल्ल्याचा बाजूने लहान मुले आणि पालकांना सफर करता यावी यासाठी एक इंजिन आणि दाेन डब्यांची बाबा गाडी आणली. माजी सनदी अधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी, मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांच्या उपस्थितीत शनिवारी या गाडीचे उद्घाटन झाले. या गाडीची सफर करण्यासाठी शहरातील पालक रविवारी सकाळी आणि सायंकाळी माेठ्या संख्येने आले हाेते. इंजिन आणि दाेन डब्यांची ही गाडी आहे. एका डब्यात नऊ लाेक बसू शकतात. सिद्धेश्वर मंदिर परिसर ते गणपती घाट यादरम्यान सफर करण्यासाठी पालिकेने शुल्कही आकारले आहे. सकाळी नऊ ते अकरा आणि सायंकाळी चार ते आठ या वेळेत गाडी उपलब्ध असेल. सध्या महापालिकाच या कामाचे नियंत्रण करीत आहे. लवकरच मक्तेदार नेमण्यात येणार आहे, असे सहायक आयुक्त विक्रमसिंह पाटील यांनी सांगितले.
--
महापालिकेेने मुलांच्या मनाेरंजनासाठी ॲडव्हेंचर पार्क सुरू केले. आता टाॅय ट्रेन आणली. ही बाबा गाडी चालविण्यासाठी लवकरच मक्तेदार नेमण्यात येईल. सिद्धेश्वर मंदिर परिसरात लवकरच लाइट अँड साउंड शाे सुरू हाेताेय. या ठिकाणी गर्दीही वाढेल. या भागातील सुरक्षेसाठी विशेष काळजी घेण्यात येणार आहे.
- विक्रम पाटील, सहायक आयुक्त, मनपा.